‘स्मार्टफोन’द्वारे करा वाहनाचे पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:56 AM2019-01-01T00:56:41+5:302019-01-01T00:56:50+5:30
संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्मार्टफोन हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. या स्मार्टफोनचा विविध कामांसाठी ...
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्मार्टफोन हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. या स्मार्टफोनचा विविध कामांसाठी वापर करण्याच्या कल्पना शिवाजी विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी संशोधनातून मांडल्या आहेत. वाहनांचे पार्किंग, घर- कार्यालयातील वीज चालू-बंद करणे, सार्वजनिक ठिकाणावरील कचराकुंडी भरल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाला देण्याच्या कामात या संशोधनाचा उपयोग होणार आहे.
विजेचा वापर, वाहनांच्या पार्किंगसाठी जागेची उपलब्धता, कचऱ्याचे निर्गतीकरण, आदींबाबतच्या अडचणी आणि प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील संगणकशास्त्रातील एमसीए आणि एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी संशोधन सुरू केले. या संशोधनात स्मार्टफोनचा वापर हा संबंधित विद्यार्थ्यांनी केंद्रस्थानी ठेवला. त्यातील अजय माने, रोहित आडनाईक, मुरली जाधव आणि पुष्कर कणंगलेकर यांनी ‘स्मार्ट स्विच अॅप’चे संशोधन मांडले.
कोणत्याही शहरात सध्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्याला पर्याय देण्यासाठी रोहित आडनाईक आणि मुरली जाधव यांनी स्मार्ट पार्किंग अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून पार्किंगसाठी कोणत्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे ते आधीच जाणून घेता येते. त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार असून, प्रदूषणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. या अॅपचा उपयोग शहर वाहतूक पोलीस विभागासह वाहनधारकांना होणार आहे. शहरातील सार्वजनिक कचराकुंडी भरल्यानंतर त्याची माहिती नोटिफिकेशनद्वारे स्मार्टफोनवर देणारे ‘स्मार्ट डस्टबीन अॅप’ हे अजय माने आणि पुष्कर कणंगलेकर या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. हे अॅप महापालिका प्रशासनासाठी उपयुक्त ठरणारे आहे. पुष्कर लाटकर या विद्यार्थ्याने ‘व्हाईस कंट्रोल लाईट’अॅप हे संशोधन केले आहे. आपल्या घरातील विजेचे दिवे चालू-बंद करण्यासाठी या अॅपचा उपयोग होतो. या अॅपमध्ये गुगल असिस्टंटद्वारे आवाजाच्या माध्यमातून सूचना दिल्यानंतर घरातील दिवे चालू अथवा बंद करता येतील. घरातील प्रकाशानुसार विजेचा वापरदेखील करता येणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी हे अॅप उपयुक्त ठरणारे आहे. विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. के. कामत, कबीर खराडे, के. एस. ओझा, यु. आर. पोळ, व्ही. एस. कुंभार, स्मिता काटकर, प्रसन्न करमरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
‘स्टार्टअप’साठी बळ देणार
या विद्यार्थ्यांनी अॅण्ड्रार्इंड, इंटरनेट आॅफ थिंग्ज् आणि स्मार्ट सेन्सर यांच्या एकत्रीकरणातून संबंधित अॅप साकारली आहेत. ती निश्चितपणे समाजासाठी उपयुक्त ठरणारी आहेत. या संशोधनाची व्याप्ती वाढवून स्टार्टअपसाठी विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या विद्यापीठाच्या इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटरद्वारे बळ दिले जाणार आहे.
२०१९ वर्षाची संकल्पना नवसंशोधन, नवोपक्रमांवर आधारित आहे. त्याचे स्वागत करताना तरुणाईमधील नवसंशोधन, कल्पनांना संधी देऊन समाजहित साधणे आवश्यक असल्याचे ‘शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅँड लिंकेजीस’चे संचालक प्रा. डॉ. आर. के. कामत यांनी सांगितले.