‘सीपीआर’ला लवकरच व्हेंटिलेंटर
By admin | Published: February 16, 2015 12:20 AM2015-02-16T00:20:09+5:302015-02-16T00:20:39+5:30
जिल्हा नियोजनची मदत : वैद्यकीय संचालनालयाची तांत्रिक मंजुरी लवकर आवश्यक
संदीप खवळे - कोल्हापूर --गोरगरिबांचा आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला ‘डीपीडीसी’च्या माध्यमातून व्हेंटिलेटरसाठी पन्नास लाख रुपये मिळणार आहेत़ या रुग्णालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार ‘डीपीडीसी’ने नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे़; पण सीपीआरचे डीपीडीसीकडे लेखाशीर्ष नसल्यामुळे हा निधी प्राप्त करण्यासाठी या प्रस्तावास वैद्यकीय संचालनालयाची तांत्रिक मंजुरी मिळणे आवश्यक आहे़ तांत्रिक मंजुरीनंतर लवकरच ‘सीपीआर’मध्ये ३१ मार्चपूर्वी व्हेंटिलेटर उपलब्ध होतील़
सीपीआरचे अधिष्ठाता डॉ़ दशरथ कोठुळे यांनी साधनसामग्री खरेदीसाठी पन्नास लाख रुपये निधीची मागणी करणारा प्रस्ताव डीपीडीसीकडे सादर केला होता़ या प्रस्तावास मान्यता दिल्याचे पत्र डीपीडीसीने सीपीआरला दिले आहे़ डॉ़ दशरथ कोठुळे यांनी हा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण संचालनालयास पाठविलेला आहे़ त्याला वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने मंजुरी दिल्याचे समजते़
तांत्रिक मंजुरीनंतर या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मंजुरी आवश्यक आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर ३१ मार्चपर्यंत सीपीआरमध्ये व्हेंटिलेटर मिळतील़
सध्या सीपीआरमध्ये तेरा व्हेंटिलेंटरची गरज आहे़ अनेक व्हेंटिलेटर बंद आहेत़ त्यामुळे डीपीडीसीच्या ५० लाख रुपयांच्या मदतीने सीपीआरमध्ये व्हेंटिलेटर यंत्रणेला गती मिळणार असल्याचे सांगितले जाते.
कायमस्वरूपी लेखाशीर्ष हवे
‘डीपीडीसी’कडे सीपीआरचे लेखाशीर्ष नसल्यामुळे डीपीडीसीकडून सीपीआरला निधी मिळण्यासाठी अडचण येत आहे़ त्यामुळे सीपीआरचे डीपीडीसीकडे कायमस्वरूपी लेखाशीर्ष तयार करण्यासाठी वैद्यकीय संचालनालय आणि वित्त व नियोजन विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ दशरथ कोठुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, यावर्षी व्हेंटिलेटरसाठी डीपीडीसीने ५० लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे़ तांत्रिक मंजुरीसाठी हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठविलेला आहे़ या प्रस्तावास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाची मंजुरी येत्या दोन दिवसांत मिळण्याचे संकेत आहेत़ तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर सीपीआरमध्ये लवकरच व्हेंटिलेटर उपलब्ध होतील़