कोडोली येथील कोविड रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर देणार- राजेंद्र पाटील-यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:34 PM2020-08-13T17:34:18+5:302020-08-13T17:34:38+5:30
रुग्णसेवा, समाजहित व सामान्य रुग्णाला डोळ्यांसमोर ठेवून कोडोली येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी शासनामार्फत व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी दिली
कोल्हापूर : रुग्णसेवा, समाजहित व सामान्य रुग्णाला डोळ्यांसमोर ठेवून कोडोली येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी शासनामार्फत व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी दिली
यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलमार्फत कोडोली (ता. पन्हाळा) येथे परिसरातील कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या शंभर बेडच्या कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील, प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते.
यड्रावकर म्हणाले, कोरोना उपाययोजनांना प्रशासनाने प्राधान्य दिले असून यामध्ये कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पिटल बेड व्यवस्थापन, डॉक्टरांचा समावेश आहे. या हॉस्पिटलसाठी शासनामार्फत सर्व सहकार्य केले जाईल, यासह पन्हाळा तालुक्यात आरोग्याच्या सर्व सुविधा युद्धपातळीवर राबविण्यात येतील. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये व वैद्यकीय संस्थांनी आपापल्या भागात अशी हॉस्पिटल उभे केल्यास शासनामार्फत त्यांना सर्व सहकार्य केले जाईल.
कोरोना रुग्णांसाठी वरदायी : पालकमंत्री
पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ग्रामीण भागातील विशेषत: पन्हाळा तालुक्यातील कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी हे रुग्णालय वरदायी ठरेल.
सचिव डॉ. जयंत पाटील म्हणाले, या हॉस्पिटलमध्ये ४० बेड ऑक्सिजनचे आहेत. शासनामार्फत आणखी व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत. येथे रुग्णांना सकस आहार, आयुर्वेदिक काढा देण्यात येणार आहे. रुग्णांकडून योगासने व व्यायाम करून घेतला जाणार असून स्वच्छ हवेसाठी रुग्णालयांमध्ये तुळशीची रोपे ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोडोली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास अभिवंत, केखले प्राथमिक आरोग्य केंद्राचे शंकर पाटील, डॉ. सूर्यकिरण वाघ, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे उपस्थित होते.