Kolhapur: जिल्हाधिकारी-आबिटकर यांच्यात शाब्दिक चकमक, एजंटांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 12:10 PM2023-04-28T12:10:52+5:302023-04-28T12:11:14+5:30
पंचगंगेची बैठक झाली, पुढे काय?
कोल्हापूर : पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यादेखत आमदार प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यात गुरुवारी शासकीय विश्रामगृहावरच्या बैठकीत शाब्दिक चकमक झाली. पुनर्वसनाच्या कामांमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप यावेळी आबिटकर यांनी केला.
धामणी प्रकल्पाच्या पुनर्वसनामध्ये दिरंगाई होत असल्याने पुढच्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. मुख्यमंत्र्यांनी काही अधिकाऱ्यांच्या काळातील कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले असतानाही तुम्ही चौकशी का करत नाही, असा सवाल आबिटकर यांनी उपस्थित केला. यावर रेखावार यांनी आपली बाजू मांडली. तेव्हा आबिटकर म्हणाले, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावा. मी महसूल खात्याच्या कारभाराचे पुरावे देतो. यावरून बैठकीत वातावरण तापले.
यावेळी अंबाबाई मंदिर विकास आराखडा, शहरातील रस्त्यांच्या कामाबाबतचा प्रश्न नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, रवींद्र माने, अमित कामत, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंचगंगेची बैठक झाली, पुढे काय?
मंडलिकांनी यावेळी पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा मांडला. मुंबईत याबाबत बैठक झाली. परंतु त्यानंतर पुढे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद यांना निधी देण्याबरोबरच त्यांनी प्रदूषण थांबवण्यासाठी काय काय केले याचीही खातरजमा करण्याची गरज मंडलिक यांनी व्यक्त केली.
खंडपीठाबाबत पुढील आठवड्यात बैठक
यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी खंडपीठाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायाधीशांची तातडीने भेट घेण्याची गरज व्यक्त केली. खासदार शिंदे यांनी खंडपीठाबाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट ठरवली जाईल, असे सांगितले. विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. परंतु त्याला निधीच नसल्याने ज्या गावांचा समावेश या प्राधिकरणामध्ये केला आहे त्यांची विरोधी मानसिकता तयार होत आहे, असे मंडलिक यांनी निदर्शनास आणून दिले.