जिल्ह्यातील युरिया टंचाई संपण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:17 AM2021-06-10T04:17:43+5:302021-06-10T04:17:43+5:30
कोल्हापूर : पुरवठा सुरळीत होऊ लागल्याने जिल्ह्यातील युरिया टंचाई संपण्याच्या मार्गावर आहे. उद्या शुक्रवारपर्यंत आरसीएफ व इफको कंपनीचा ३ ...
कोल्हापूर : पुरवठा सुरळीत होऊ लागल्याने जिल्ह्यातील युरिया टंचाई संपण्याच्या मार्गावर आहे. उद्या शुक्रवारपर्यंत आरसीएफ व इफको कंपनीचा ३ हजार ९०० टन युरिया रेल्वे वॅगनने कोल्हापुरात येत आहे. याच महिन्यात १५ तारखेपर्यंत आणखी चार हजार टन युरिया मिळणार असल्याने या महिन्यातील कोटा बऱ्यापैकी पूर्ण होणार आहे.
कोणतेही खत देताना त्याला जोड म्हणून युरिया दिलाच जात असल्याने शेतकऱ्यांकडून युरियाची वर्षभर मागणी असते. आता तर माॅन्सूनचे ढग दाटल्याने शेतकरी खरीप पेरणीत गुंतला आहे. उसाचा मिरगी डोस देण्याचीही गडबड सुरू आहे. अशा काळात युरियाची मागणी प्रचंड वाढते, पण नेमकी हीच संधी साधत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होताना दिसत आहे. टंचाई असल्याचे सांगत इतर खतेही माथी मारण्याचेही प्रकार घडत आहेत. मागणी वाढल्याने पुरवठाही विस्कळीत होत असल्याने कृषी विभागाने कंपन्यांशी संपर्क साधत पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक खतांचा पुरवठा करणारी इफको व आरसीएफ या कंपन्यांनी या महिन्यातील कोट्याप्रमाणे युरियाची रॅक कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आली आहे. ती आज गुरुवारी कोल्हापुरात येत असून, शुक्रवारपासून प्रत्यक्ष विक्री केंद्रावर त्याचे वितरण सुरू केले जणार आहे. इफकोची २६०० तर, आरसीएफची १३०० टनाची रॅक आहे. एकूण ३ हजार ९०० टन युरिया उपलब्ध झाल्यामुळे बऱ्यापैकी टंचाई कमी होणार आहे. आणखी आठवडाभरात चार हजार टन येणार असल्याने तुटवडा संपेल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.
चौकट
जून महिन्यासाठी १७ हजार युरियाची मागणी
जिल्ह्यासाठी वर्षभर ७३ हजार टन युरिया लागतो. जून महिन्यासाठी कृषी विभागाने अधिकच्या मागणीसह १७ हजार टनांची मागणी नाेंदवली आहे. त्यातील ८ हजार टन युरिया आतापर्यंत उपलब्ध झाला आहे.
चौकट
अमोनियम सल्फेट, सुफला, १० : २६ : २६ या ग्रेडच्या खतांची मागणी जास्त आहे; पण त्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.