वारणा योजना, वस्रोद्योगाच्या प्रश्नावर ठरणार मताधिक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:29 PM2019-04-24T23:29:15+5:302019-04-24T23:29:30+5:30
अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील विधानसभा मतदारसंघात गत निवडणुकीपेक्षा दोन टक्के जास्त मतदान झाले. खासदार राजू ...
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील विधानसभा मतदारसंघात गत निवडणुकीपेक्षा दोन टक्के जास्त मतदान झाले. खासदार राजू शेट्टी व धैर्यशील माने यांच्यात थेट सामना पाहावयास मिळाला. या निवडणुकीत पाणीप्रश्नावरून विरोधकांनी शेट्टींना घेरले असले तरी शहराचा पाणीप्रश्न मीच सोडविणार, अशी ग्वाही देत शेट्टी यांनीही प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे इचलकरंजीचे लीड (मताधिक्य) कोणाच्या बाजूने राहणार, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर या निवडणुकीतील गणितांवरच आगामी विधानसभा निवडणुकीची बेरीज-वजाबाकी अवलंबून राहणार आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सन २०१४ साली
६७ टक्के मतदान झाले होते. यंदा
६९ टक्के मतदान झाले. झालेल्या एकूण मतदानापैकी ग्रामीण भागातील पाच गावांत शहराच्या तुलनेत फार कमी मतदान आहे. त्यामुळे शहराच्या मतदानावरच निवडणुकीचा कौल अवलंबून असतो.
शहरामध्ये सुरुवातीपासूनच वारणा नळ पाणीपुरवठा योजना व वस्रोद्योगातील अडचणी या दोन मुद्द्यांवर खासदार शेट्टी यांना विरोधकांनी घेरले होते. परिणामी, सुरुवातीला संपूर्ण शहरात शेट्टीविरोधी वातावरण निर्माण झाले होते. प्रचाराच्या व सभांच्या माध्यमातून या दोन्ही मुद्द्यांना काही प्रमाणात खोडून काढण्यात शेट्टी व महाआघाडीतील नेत्यांना यश मिळाले असल्याचे सांगण्यात येत असले तरी निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
धैर्यशील माने यांनीही मतदारसंघात आमदार सुरेश हाळवणकर यांच्या माध्यमातून व शिवसेनेला सोबत घेत प्रचार यंत्रणा राबविली. त्यामध्ये ताराराणी आघाडीसह युतीतील घटक पक्ष सहभागी होते. त्यामुळे माने यांनाच या मतदारसंघातून अधिक मताधिक्य मिळेल, असे सांगितले जात आहे.
या मतदारसंघात खासदार शेट्टी यांच्या बाजूने कॉँग्रेस, राष्टÑवादी, शाहू विकास आघाडी यासह महाआघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग नोंदविला. मात्र, नेत्यांभोवतीच प्रचार यंत्रणा फिरल्याचे चित्र दिसले.
धैयर्शील माने यांच्या प्रचारात प्रमुख पदाधिकारी यांच्यासह बुथ लेवल कार्यकर्त्यांपर्यंत प्रचार यंत्रणा सक्रिय दिसून आली. याचाही परिणाम मताधिक्यावर दिसून येणार आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांनीही टक्कर दिल्याचे दिसत होते. त्यामुळे ते किती मते घेणार यावरही मताधिक्य अवलंबून आहे. एकूणच चुरशीने झालेल्या निवडणुकीत कोणाची वर्णी लागणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.
मतदारसंघातील सभा
या मतदारसंघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे संस्थापक राज ठाकरे, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, प्रकाश आंबेडकर, अभिनेते प्रकाश राज, आदी मोठ्या सभा घेण्यात आल्या. याबरोबर आमदार सुरेश हाळवणकर तसेच दुसºया फळीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कोपरा सभा घेतल्या. प्रचाराच्या शेवट दिवशी पदयात्रा व मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली.