व्हर्टिकल अॅडव्हेंचरमुळे पर्यटनवाढीला चालना : चंद्रकांत पाटील-जेऊर येथे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:26 AM2018-06-10T00:26:15+5:302018-06-10T00:26:15+5:30
देवाळे : लोकांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शेती व्यवसायाबरोबरच पर्यटनवाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच या व्हर्टिकल अॅडव्हेंचर पार्कची उभारणी केली आहे. या पार्कमुळे जिल्ह्यातील पर्यटनवाढीस चालना मिळणार असून, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते जेऊर येथील व्हर्टिकल अॅडव्हेंचर पार्कच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
मसाई पठाराच्या पायथ्याशी सुमारे दोन कोटी रुपये खर्चून जिऊर ग्रामपंचायत, वनविभाग तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समिती, जिऊर यांच्यावतीने उभारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या व्हर्टिकल अॅडव्हेंचर पार्कचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
मंत्री पाटील म्हणाले, पर्यटकांना या पार्ककडे येणे जाणे सुलभ व्हावे म्हणून या भागातील रस्ते दुरुस्त करणार आहे. अत्यावश्यक सर्व सुविधा व निधी पुरविणार आहे. या पार्कच्या प्रसिद्धीच्या उद्देशाने हिवाळी व उन्हाळी सुट्टीत या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीत पास सुविधा उपलब्ध केली आहे. पासधारक विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात प्रवेश दिला जाईल. शेतकºयांनी पारंपरिक शेती व्यवसायावर अवलंबून न राहता कुक्कुटपालन, शेळीपालन या संकल्पना स्वीकाराव्यात. पर्यटनवाढीसाठी आडवाटेवरील कोल्हापूर, राधानगरी येथील काजवा महोत्सवसारख्या उपक्रमातून स्थानिक लोकांना फायदा व्हावा, या उद्देशाने हा पार्क उभारला आहे.
स्थानिकांना रोजगार मिळाल्याने त्यांचे शहराकडे रोजगारासाठी येणारे लोंढे थांबतील. ग्रामीण भागही स्वयंपूर्ण होईल. स्वागत उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल यांनी केले. प्रास्ताविक सरपंच प्रियांका महाडिक यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी अजय पवार, प्रभारी तहसीलदार अनंत गुरव, के.डी.सी.सी.चे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, पंचायत समिती सदस्य अनिल कंदूरकर, सचिन सिपुगडे, बाळासो खांडेकर, केदार उरुणकर, विलास पोवार, उत्तम कंदूरकर, वंदना पोरे, वनविभागाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
आमदार, खासदार यांची दांडी
जिल्ह्यातील पहिला नावीन्यपूर्ण असलेल्या या अॅडव्हेंचर पार्कच्या उद्घाटन कार्यक्रमास पन्हाळा-शाहूवाडीसह सर्व जिल्ह्यातील आमदार, खासदार अनुपस्थित राहिले. लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा उपस्थितांत चालू होती.
जेऊर येथे शनिवारी व्हर्टिकल अॅडव्हेंचर पार्कचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रियंका महाडिक, अनिल कंदुरकर, माधुरी साळोखे, वनविभाग अधिकारी, आदी उपस्थित होते.