ज्येष्ठ रंगकर्मी विजय पोवार यांचे निधन
By admin | Published: January 23, 2017 01:16 AM2017-01-23T01:16:50+5:302017-01-23T01:16:50+5:30
ज्येष्ठ रंगकर्मी विजय पोवार यांचे निधन
कोल्हापूर : ज्येष्ठ रंगकर्मी, कवी विजय शंकर पोवार (वय ५५, कोडोली, ता. पन्हाळा ) यांचे रविवारी सायंकाळी गडहिंग्लज येथे निधन झाले. गेली अनेक वर्षे ते शिवाजी विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात ते निमंत्रित व्याख्याते म्हणून काम करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
पोवार यांना दोन महिन्यांपासून मूतखड्याचा त्रास होत होता. त्यांच्यावर गडहिंग्लजमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, जंतूसंसर्ग झाल्याने त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. तत्पूर्वीच रविवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले.
पोवार यांनी कोल्हापुरातील तंबाखू संघामध्ये अल्पकाळ नोकरी केली. कलाकाराचा पिंड असल्यामुळे ते या नोकरीत फार काळ रमले नाहीत. त्यांनी नोकरीला रामराम ठोकून कलाक्षेत्राला पूर्ण वाहून घेतले. स्वत: अनेक नाटके दिग्दर्शित केली. प्रत्येक दिग्दर्शनात त्यांनी स्वत:ची छाप ठेवली. आरती प्रभू, रॉय किणीकर, ग्रेस, प्रा. दिलीप जगताप या साहित्यिकांचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी अनेक दर्जेदार कविता लिहिल्या. त्यांनी सादर केलेले ‘खजिन्याची विहीर’ हे नाटक खूप गाजले. गोव्यामध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) त्यांनी भूमिका केलेला ‘चौकट’ नावाचा लघुपट प्रचंड गाजला होता. पोवार यांनी पारंपरिक रंगभूमीला छेद देत, नव्या रंगभूमीचा स्वीकार करण्यासाठीची सक्षम पिढी तयार केली. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी सातत्याने नवनवीन प्रयोग केले. त्यांनी सादर केलेल्या कलाकृतींना अनेक बक्षिसे मिळाली होती. रंगभूमीविषयीच्या प्रचंड व्यासंगाचे संस्कार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबरच नव्या पिढीवरही केले. (प्रतिनिधी)