ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पंदारे यांचे निधन
By Admin | Published: September 15, 2014 01:00 AM2014-09-15T01:00:30+5:302014-09-15T23:28:25+5:30
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे विद्यमान अध्यक्ष
कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे विद्यमान अध्यक्ष, राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् को-आॅपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष वसंतराव कृष्णराव पंदारे यांचे ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी सात वाजता निधन झाले. पंदारे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या संघर्षमय जीवनाची सुरुवात केली होती. वडील कृष्णराव हे गवंडी काम करीत होते. अशा गरीब कुटुंबात जन्मलेल्या वसंतराव यांनी तरुणपणात १९४२ च्या ‘चलेजाव’ या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. पुढे महसूल विभागात कार्यरत असताना १९७६ साली महसूल विभागामध्ये मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचे नेतृत्व करीत शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला. त्यांचा अनेक शासकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकारी संस्थांशी निकटचा संबध होता. शिवाजी पेठेचे आर्थिक केंद्र असलेल्या बलभीम सहकारी बँक आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट बँकेशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या संस्थेचे संस्थापक सदस्य म्हणून आजतागायत त्यांचा क्रियाशीलपणे सहभाग होता. ते संस्थेचे विद्यमान अध्यक्ष होते. याचबरोबर शिवाजी तरुण मंडळाचे ते संस्थापक सदस्य व विद्यमान सदस्य होते. कोल्हापूर जिल्ह्यामधील शासकीय कर्मचारी संघटनेच्या चळवळीमधील एक कृतीशील नेतृत्व म्हणून वसंतराव पंदारे यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओळख निर्माण झाली होती. राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँकेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र पंदारे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ चिरंजीव रवींद्र, राजेंद्र, शैलेंद्र व कन्या शैलजा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा पार्थिवावर रविवारी दुपारी दोन वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.