ज्येष्ठ शिल्पकार संजय तडसरकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 01:03 PM2023-11-09T13:03:16+5:302023-11-09T13:03:35+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार प्राचार्य संजय दादासाहेब तडसरकर (वय ५७, रा. मुक्तसैनिक वसाहत, कोल्हापूर ) यांचे बुधवारी पहाटे ...
कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार प्राचार्य संजय दादासाहेब तडसरकर (वय ५७, रा. मुक्तसैनिक वसाहत, कोल्हापूर) यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर मूळ तडसर जि. सांगली गावी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांचे निधन झाले.
सांगली येथे शांतिनिकेतनमध्ये जी. डी. आर्टचे शिक्षण, तेथेच कला विश्व कला महाविद्यालयात दोन वर्षे अध्ययन केले आणि शेवटच्या दोन वर्षांच्या शिक्षणासाठी ते कोल्हापूरला आले. येथील दळवी आर्ट इन्स्टिट्यूटमधून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे शिल्पकलेमध्ये जी. डी. आर्ट पूर्ण केले. जे. जे. मध्ये सुरू झालेल्या कला महोत्सवाची संकल्पना आकारास येण्यामध्ये विद्यार्थी म्हणून तडसरकर यांचे योगदान आहे.
मुंबईहून कोल्हापुरात परतल्यावर कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या स्टुडिओमध्ये रवींद्र मेस्त्री यांच्या हाताखाली त्यांनी काम केले. शिवाजी पेठेत रहात असताना त्यांनी रंकाळा बचाव या आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतला होता. वडणगेकर गुरुजींचे नात जावई असणाऱ्या तडसरकर यांनी कुमावत सेवा संघाच्या कला मंदिर कला महाविद्यालय येथे कै. टी. के. अण्णा, डी. व्ही. वडणगेकर या गुरुवर्यांसोबत विद्यार्थी घडवले. विद्यार्थीप्रिय शिक्षक, सौम्य परंतु परखड बोलणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, काका, चुलतभाऊ असा परिवार आहे.
त्यांची अनेक शिल्पे भारतभर असून त्यांच अनेक विद्यार्थी शिल्पकलेत कार्यरत आहेत. कागलमधील शाहू कारखान्यासमोरील शाहू महाराजांचा पुतळा, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समोरील यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा त्यांनीच बनवला आहे.