नाव, गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची; कोल्हापूरमुळेच सुलोचना यांची कारकीर्द उंचीवर

By संदीप आडनाईक | Published: December 11, 2022 06:05 PM2022-12-11T18:05:07+5:302022-12-11T18:05:37+5:30

ज्येष्ठ गायिका लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा कोल्हापूरशी जिव्हाळ्याचा संबंध.

Veteran singer Lavani Samradni Sulochana Chavan had a close relationship with Kolhapur | नाव, गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची; कोल्हापूरमुळेच सुलोचना यांची कारकीर्द उंचीवर

नाव, गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची; कोल्हापूरमुळेच सुलोचना यांची कारकीर्द उंचीवर

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ गायिका लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा कोल्हापूरशी जिव्हाळ्याचा संबंध. जन्म मुंबईचा असला तरी कोल्हापूरच्या या सूनबाईंची गायन कारकीर्द कोल्हापूरमुळेच एका उंचीवर पोहोचली. जगदीश खेबूडकर यांच्या आग्रहामुळे त्यांनी गायिलेल्या एका लावणीमुळे त्यांना लावणीसम्राज्ञी म्हणून ओळख मिळाली. संगीतकार वसंत देसाई, बाळ पळसुले, राम कदम यांनी त्यांच्या गाण्यांना संगीत दिले. कोल्हापुरातील संगीत क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राजा बढे यांच्या १९५२ च्या ‘कलगीतुरा’ या चित्रपटासाठी त्यांनी के. सुलाेचना या नावाने प्रथम लावणी गायिली. याचे दिग्दर्शक कोल्हापूरचे श्यामराव चव्हाण यांनी सुलोचना यांना लावणी गायनातला खरा मार्ग दाखवला. लावणीची अचूक शब्दफेक चव्हाण यांनी त्यांना शिकविली. १२ ऑगस्ट १९५३ रोजी त्यांनी सुलोचना यांच्याशी लग्न केले आणि त्या कोल्हापूरच्या सूनबाई झाल्या. राजारामपुरीतील अकराव्या गल्लीत आजही त्यांचे घर आहे. या घरी त्या अनेकदा येत. ‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ या जगदीश खेबूडकर यांच्या पहिल्या लावणीने इतिहास रचला आणि सुलोचना मराठीसाठी लावणीसम्राज्ञी ठरल्या.

शाहीर राजू राऊत यांनी कोल्हापुरातील त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सुलोचना यांच्यासोबत आतापर्यंत चारवेळा एकाच व्यासपीठावर सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापुरात १९९७ मध्ये शाहू महोत्सवात त्या आल्या तेव्हा त्यांनी राऊत यांच्या घरी भेट दिली होती. दुर्देव म्हणजे आजच शनिवारी त्यांना ठाण्यात रोटरीच्या भारतीय अस्मिता कार्यक्रमात महाराष्ट्रातील दिग्गज लोकांसमवेत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते, परंतु त्यांचे निधन झाल्याने हा सोहळा रद्द झाला.

कोल्हापुरातील गायक महेश हिरेमठ आणि शुभदा हिरेमठ यांनीही त्यांची आठवण सांगितली. त्यांच्या अंतरंग या संस्थेचा पहिला जगदीश खेबूडकर पुरस्कार २०१२ मध्ये गडकरी सभागृहात सुलोचना चव्हाण यांना देण्यात आला होता. याशिवाय शाहुपुरीतील सर्वमंगल सेवा संस्था (नेत्रपेढी) संचलित नेत्रोपचार मोफत केंद्राला सुलोचना चव्हाण यांनी भेट दिली होती. यावेळी रमेश लालवाणी, चंद्रकांत मेहता यांनी त्यांचे स्वागत केले होते.


 

Web Title: Veteran singer Lavani Samradni Sulochana Chavan had a close relationship with Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.