गोकूळ छाननीत दोन्ही गटाच्या दिग्गजांची दांडी आजपासून माघार : दूध पुरवठ्याचा नियम ठरला अडचणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:24 AM2021-04-06T04:24:24+5:302021-04-06T04:24:24+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (‘गोकूळ’) निवडणुकीतील साेमवारी झालेल्या छाननीत भारती विजयसिंह डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (‘गोकूळ’) निवडणुकीतील साेमवारी झालेल्या छाननीत भारती विजयसिंह डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, पी. जी. शिंदे, यशवंत नांदेकर आदी प्रमुखांचे अर्ज अवैध ठरले. संघाच्या पोटनियमानुसार दूध पुरवठ्यासह पशुखाद्याच्या अटींची पूर्तता न केल्याचा फटका दोन्ही आघाडीच्या दिग्गजांना बसला. छाननीत ४१ जणांचे अर्ज थेट अवैध ठरले तर ३५ जणांची सुनावणी घेऊन आज निर्णय होणार आहे, त्यामुळे ७६ जणांचे १०४ अर्ज अवैध ठरण्याची शक्यता आहे.
‘गोकूळ’च्या २१ जागांसाठी ४८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत ७६ जणांचे १०४ अर्ज अवैध ठरले, त्यापैकी ३५ जणांनी हरकत घेतली, त्यावर सुनावणी झाली असून आज, मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी निकाल देणार आहेत. दरम्यान आज, मंगळवारपासून उमेदवारी अर्ज माघारीस सुरुवात होत आहे. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून, २२ एप्रिलला चिन्हांचे वाटप आहे. २ मे रोजी मतदान होणार आहे. ४ मे रोजी मतमोजणी आहे. माघार ६ ते २० एप्रिल दरम्यान होणार आहे. हा कालावधीत मोठा वाटत असला तरी त्यातील सहा दिवस सुट्या आहेत. त्यामुळे माघारीसाठी नऊच दिवस मिळणार आहेत. सत्तारूढ व विरोधी आघाडीत ही लढत होत असली तरी दोन्ही गटाकडून इच्छुकांचे रुसवे-फुगवे दूर करून पॅनलची रचना कशी होती यावरच माघारीच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे.