स्पंदन कलेचे - भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:23 AM2021-09-25T04:23:39+5:302021-09-25T04:23:39+5:30
फुलेवाडी पहिला स्टॉप, कोल्हापूर. स्पंदन शाश्वत ब्रह्मांडाची, त्यातील गृह-ताऱ्यांची, आकाशगंगेत स्वत:मध्ये सामावलेल्या अनेक रहस्यांची, रोज नव्या आशेने उगवणाऱ्या चंद्र-सूर्याची ...
फुलेवाडी पहिला स्टॉप, कोल्हापूर.
स्पंदन शाश्वत ब्रह्मांडाची, त्यातील गृह-ताऱ्यांची, आकाशगंगेत स्वत:मध्ये सामावलेल्या अनेक रहस्यांची, रोज नव्या आशेने उगवणाऱ्या चंद्र-सूर्याची भूतलावर बागडणाऱ्या अनेक जीवांची, निसर्गाच्या सुंदर चक्राची, सोबतीला बदलाची भूमिका घेऊन येणाऱ्या बेधुंद ऋतूंचे, एकंदरच समतोलवृत्ती, प्रेम, आदरभाव, विवेकबुद्धी आणि कलेच्या जोरावर या सृष्टीला आणि ब्रह्मांडाला सावरणाऱ्या सत्त्वपूर्ण शक्तीचे हे जणू गोड स्पंदनच.
अर्थात, स्पंदन हा फक्त शब्द नसून ती मानवी अंतरमनात वसणारी खोल संकल्पना आहे. साद-प्रतिसाद, सुख-दु:ख, प्रेम-राग आणि मानवजातीमध्ये खासकरून नैसर्गिक शक्तींमधून नवरसांचे जे वरदान सृष्टीला मिळाले आहे, त्याचे प्रतिबिंब म्हणजे स्पंदन. निसर्गाच्या सुरात आणि सागरी लाटांच्या तालात दंग होऊन खोडकर मुलाप्रमाणे या वायुमंडलात इकडून तिकडे बागडणाऱ्या लहरी म्हणजे स्पंदन, या सृष्टीच्या सादाला प्रतिसाद देऊन कलात्मक वलये निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे स्पंदन. सृष्टीच्या आत्म्याला सतत जागृत ठेवून ही कलेची वलये समस्त चराचरात पसरवून मानवरूपी प्राण्याच्या नसानसात कलेला जन्म देणारा हा आईरूपी निसर्ग म्हणजे स्पंदनच.
स्पंदन हे मानवरूपी व निसर्गरूपी अंतरंगी जीवनातला एक सक्रिय ताल आहे. जी प्रत्येक सजीव आणि निर्जीवांमध्ये, विश्वातील प्रत्येक कणामध्ये, मानवी मेंदू आणि त्यातील समाविष्ट चेतासंस्थांमधून भरभरून वाहत आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीची रचना ज्या सूक्ष्म कणांपासून झाली ते अणुरेणु म्हणजेच प्रोटोन्स आणि न्युट्रोन्स यांच्या सहबंधनांमध्ये आणि त्यापासून होणाऱ्या नवनिर्मितीमध्ये, अर्थात सूक्ष्मातिसूक्ष्म अशा खूपच लहान घटकांपासून ते हिमालयाच्या भव्यातिभव्य मेरुपर्वतापर्यंत सर्वांच्याच दृष्टिकोनाच्या एका जनरेतून पाहिले तर एखाद्या गोष्टीची अथवा घटनेची लागणारी पहिली चाहूल म्हणजे स्पंदन.
स्पंदन नक्कीच एक सीमित शब्द नसून ते एक असीमित, अनियमित, प्रत्येकामध्ये भरून उरणारी, कमी होऊन वाढणारी, आणि वाढता-वाढता पुन्हा कमी होणारी, निसर्गाच्या नियमबाह्य कक्षेत आणि मानवी अंतरमनात मुक्त स्वैराचार करणारी ऊर्जेची प्रखर जननी आहे. पण विरोधात जाता वेलींच्या कुंद पानांवर बागडून सळसळ करीत सागराच्या खोल पोटात शिरणारी आणि हलकेच उठून सर्वत्र शीतलेचा अनुभव देणारी शीतलकायेची ती सरस्वतीच आहे जणू.
शेक्सपिअर म्हणतो, नावात काय आहे? पण स्पंदन नावातच कलेचे गूढ दडलेले आहे. ना याला कोणती दिशा थांबवू शकते, ना कोणती चौकट या मर्यादा घालू शकते. वाढत जाणाऱ्या चरेप्रमाणे याचे महत्त्व अपार आहे. या सकारात्मक लहरी पोटामध्ये सामावून आई मुलाला गर्भामध्ये वाढवत असते. गर्भामध्ये असताना, ती मुलावर योग्य संस्कार करत असते. या गर्भसंस्काराच्या ऊर्जालहरी त्या मुलावर योग्य संस्कार घडवून आणून प्रेमाची व कलेची अद्भुत स्पंदने मुलाच्या नसानसात दौडू लागतात. आणि एक वैशिष्ट्यपूर्ण कलाच त्या गर्भामध्ये निर्माण होऊ लागते. विशिष्ट प्रकारची स्पंदने तेथे तयार होतात. नऊ महिन्यांच्या कठोर तपश्चर्येनंतर ज्यावेळी ही ऊर्जा गर्भबंधनातून मुक्त होण्यासाठी धडपडते, त्यावेळी गर्भातील त्या ऊर्जेचा व नैसर्गिक ऊर्जेच्या मीलनाचा साक्षात्कार घडून येतो. मुलाच्या रडण्याची आणि आईच्या आनंदरूपी समाधानकारक हास्याची स्पंदने सृष्टीच्या चराचरात हर्षोत्सव साजरा करू लागतात. गर्भरूपी जीवनाचे पाश तोडून, पण त्या गर्भसंस्काराची जाण राखून भूतलावरील प्रथम श्वासाची स्पंदने ही त्या जीवाला खरी जगण्याची कला शिकवतात. जगण्याच्या कलेच्या स्पंदनाची थोर दाता आईच म्हणावी लागेल. विज्ञान, अध्यात्म यांच्या पलीकडे जाऊन ते एक स्वतंत्र स्पंदनच आहे.