कुलगुरू शिंदे यांनी पदभार स्वीकारला
By admin | Published: June 19, 2015 12:40 AM2015-06-19T00:40:28+5:302015-06-19T00:40:40+5:30
कौतुक पाहून भारावले...‘देवा’ने जिद्द आणि कष्टाने आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर यश मिळविले असल्याचे डॉ. शिंदे यांच्या आई नागरबाई यांनी सांगितले.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे नवे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी ज्ञानदंडासह विद्यापीठाच्या १२ व्या कुलगुरुपदाचा कार्यभार डॉ. शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. नव्या कुलगुरुंच्या स्वागतासाठी विद्यापीठातील अधिकारी, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.
डॉ. शिंदे यांनी गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्यापीठ परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते मुख्य प्रशासकीय इमारतीत आले. याठिकाणी त्यांचे डॉ. भोईटे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तेथून डॉ. शिंदे कुलगुरू कक्षात आले. याठिकाणी तांत्रिक बाबी पूर्ण करून
डॉ. शिंदे यांनी कार्यभार स्वीकारला. त्यांच्याकडे डॉ. भोईटे यांनी यावेळी ज्ञानदंड सुपूर्द केला. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, बीसीयुडी संचालक डॉ. आर. बी. पाटील, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कोंगळे, माजी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. भारती पाटील, रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. एन. भोसले, डॉ. व्ही. जे. फुलारी, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे चिटणीस अतुल ऐतावडेकर आदी उपस्थित होते. दुपारी उशिरापर्यंत डॉ. शिंदे यांच्या स्वागतासाठी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, कार्यभार स्वीकारल्यानंतर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठ अधिकारी आणि काही विभागप्रमुखांशी चर्चा केली. विद्यापीठाच्या योजना, उपक्रमांचा त्यांनी धावता आढावा घेतला.
कौतुक पाहून भारावले...‘देवा’ने जिद्द आणि कष्टाने आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर यश मिळविले असल्याचे डॉ. शिंदे यांच्या आई नागरबाई यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ऐतिहासिक कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ‘देवा’ची निवड झाल्याने मी खूप आनंदित आहे. वडील गेल्यानंतर ‘देवा’ने शिक्षणात यश मिळाल्यानंतर कौतुकासाठी एकमेव मीच असायची. आज ‘देवा’चे सगळे कौतुक करणारे पाहिल्यानंतर मी भारावले आहे. जबाबदारीने काम करून तो विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालेल. (प्रतिनिध