कुलगुरू दिगंबर शिर्के यांनी स्वीकारला मुंबई विद्यापीठाचा कार्यभार
By संतोष.मिठारी | Published: September 10, 2022 01:36 PM2022-09-10T13:36:15+5:302022-09-10T13:38:04+5:30
Digambar Shirke : मुंबई विद्यापीठाचे सुहास पेडणेकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ शनिवारी संपणार आहे.
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. या पदाचा कार्यभार त्यांच्यावर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी सोपविला आहे. मुंबई विद्यापीठाचे सुहास पेडणेकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ शनिवारी संपणार आहे. त्यावर या विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू निवडी पर्यंत डॉ. शिर्के यांच्यावर प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना याबाबतचे पत्र शुक्रवारी कुलपती कार्यालयाकडून प्राप्त झाले.
डॉ. शिर्के गेल्या अडीच वर्षापासून शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत प्रभारी कुलसचिव, प्रकुलगुरुपदी आणि शासनाच्या विविध समित्या, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांमध्ये काम केले आहे. त्यांना पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. या पदाचा कार्यभार त्यांनी डॉ. पेडणेकर यांच्या हस्ते शनिवारी सकाळी स्वीकारला. दरम्यान, यापूर्वी माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना देखील मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी काम करण्याची संधी मिळाली होती.
मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. ही संधी देऊन कुलपतींनी शिवाजी विद्यापीठाचा सन्मान केला आहे.
- कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के