कुलगुरूंनी दिली तंजावर विद्यापीठाला भेट, तंजावरी मराठी भाषेचा होणार अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 05:32 PM2019-05-06T17:32:45+5:302019-05-06T17:34:44+5:30
तंजावर (तमिळनाडू) येथील तमिळ विद्यापीठ आणि सरस्वती महाल ग्रंथालय यांच्यासमवेत तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार करण्याबाबत तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रह्मण्यम यांच्याशी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची चर्चा झाली. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी त्याबाबत विद्यापीठाच्या अभ्यासकांसमवेत तंजावरला भेट दिली.
कोल्हापूर : तंजावर (तमिळनाडू) येथील तमिळ विद्यापीठ आणि सरस्वती महाल ग्रंथालय यांच्यासमवेत तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार करण्याबाबत तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रह्मण्यम यांच्याशी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची चर्चा झाली. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी त्याबाबत विद्यापीठाच्या अभ्यासकांसमवेत तंजावरला भेट दिली.
तंजावर येथील तमिळ विद्यापीठाने मराठा इतिहास आणि मराठी भाषेसंदर्भातील ४0 हजारांहून अधिक कागदपत्रे जतन करून ठेवलेली आहेत. हे विद्यापीठ भाषेला केंद्रस्थानी ठेऊन स्थापन करण्यात आले असून, या विद्यापीठाकडून मोडी कागदपत्रांचे भाषांतर कार्यही मोठ्या प्रमाणात झाले आहे; त्यामुळे या विद्यापीठाशी तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार शिवाजी विद्यापीठाच्या विचाराधीन होता. त्याचबरोबर सरस्वती महल ग्रंथालयात मोडी कागदपत्रांसह हजारो मराठी ग्रंथांचे जतन केलेले असल्याने संशोधकांना अभ्यासासाठी ते सहज उपलब्ध व्हावे; यासाठी या ग्रंथालयाबरोबरही सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तंजावर येथील सरस्वती महल ग्रंथालयामध्ये बैठक झाली.
सरस्वती महल ग्रंथालयातील उपलब्ध अभ्यास साधनांसंदर्भात तंजावरचे जिल्हाधिकारी ए. अण्णादुराई यांच्यासमवेतही स्वतंत्र बैठक झाली. दोन्ही बैठका तंजावरचे राजे शिवाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. या बैठकांना तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रह्मण्यम, कुलसचिव मुथ्थूकुमार यांच्यासह तमिळ विद्यापीठातील डॉ. विवेकानंद गोपाळ, डॉ. जयकुमार, डॉ. कविता, डॉ. शीला, डॉ. नीलकंठ हे भारतीय भाषा आणि सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक उपस्थित होते; तर, शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, समिती सदस्य डॉ. अवनीश पाटील, नंदकुमार मोरे, निलांबरी जगताप, गणेश नेर्लेकर-देसाई उपस्थित होते.
दालन उभारण्याबाबत चर्चा
या बैठकीमध्ये वरील सर्व मुद्यांसह तंजावरला मराठी अध्यासन आणि शिवाजी विद्यापीठात तमिळ अध्यासन स्थापन करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. शिवाजी विद्यापीठ नवे म्युझिअम साकारत असून, या म्युझिअममध्ये तंजावर येथील मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित दालन उभारण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा यावेळी झाली.