कुलगुरूंनी सत्यशोधन समितीद्वारे सुनावणी घ्यावी ; ‘सुटा’ची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 04:46 PM2019-03-07T16:46:29+5:302019-03-07T16:48:27+5:30
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैर, भ्रष्ट आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप करीत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने आंदोलन सुरू केले आहे. त्यातील एक टप्पा म्हणून शुक्रवारी ‘सुटा’च्या आठ सदस्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. कुलगुरूंनी सत्यशोधन समिती स्थापन करून त्यामार्फत सुनावणी घ्यावी, अशी मागणी यावेळी ‘सुटा’ने केली.
कोल्हापूर : कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैर, भ्रष्ट आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप करीत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने आंदोलन सुरू केले आहे. त्यातील एक टप्पा म्हणून शुक्रवारी ‘सुटा’च्या आठ सदस्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. कुलगुरूंनी सत्यशोधन समिती स्थापन करून त्यामार्फत सुनावणी घ्यावी, अशी मागणी यावेळी ‘सुटा’ने केली.
‘सुटा’ने दि. १० फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या कार्यकारिणीमध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या कारभाराविरुद्ध पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘सुटा’च्या सदस्यांनी लाक्षणिक उपोषण केले.
त्यामध्ये डॉ. गजानन चव्हाण, एस. वाय. पाटील, उषा पाटील (कोल्हापूर), युवराज पाटील (सांगली), तानाजी कांबळे, ए. एन. भिंगारे, व्ही. बी. सुतार, सुरेश पोळ (सातारा) यांचा समावेश होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ‘सुटा’ सदस्य प्रा. एम. एल. सोनटक्के, सचिन बोलाईकर, एच. डी. पाटील, ‘सुटा’चे उपाध्यक्ष प्रा. अरुण पाटील, खजिनदार प्रा. इला जोगी, आदी उपस्थित होते.
कुलगुरूंची चौकशी व्हावी, अशी ‘सुटा’ची मुख्य मागणी आहे. कुलगुरूंनी ‘सुटा’चे कोणतेही आरोप अद्याप अमान्य केल्याचे लेखी स्वरूपात कळविलेले नाही. त्यांनी त्याबाबत जाहीर सुनावणी घ्यावी, अशी ‘सुटा’ची मागणी आहे. त्यांनी सत्यशोधन समितीही स्थापन करून त्यामार्फत सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. पण, त्याबाबत कुलगुरू सकारात्मक नाहीत.
संलग्नीकरणाच्या अटी, विद्यापीठाचे निर्देश, तक्रार निवारण समितीचे निर्णय, आदींचा भंग करणाऱ्या महाविद्यालय, व्यवस्थापनासाठी राज्य शासनाने कडक दंडसंहिता लागू केली आहे. ती दंडसंहिता कुलगुरूंनी दडवून ठेवली आहे. माहितीच्या अधिकाराखाली ‘सुटा’ने विद्यापीठ प्रशासनाला १२ अर्ज दिले आहेत. काही प्रकरणांबाबत जाणीवपूर्वक माहिती देण्याचे टाळले आहे, असे ‘सुटा’चे सहकार्यवाह प्रा. सुभाष जाधव यांनी सांगितले.
आता १४ मार्चला धरणे आंदोलन
‘सुटा’च्या शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना बुधवारी (दि. ६) विविध मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलन तीव्र करण्याच्या निर्णयानुसार दि. १४ मार्च रोजी ‘सुटा’तर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले जाईल, असे प्रा. जाधव यांनी सांगितले.