वाळवा तालुक्याला मिळणार ‘कृष्णा’चे उपाध्यक्षपद

By admin | Published: June 28, 2015 11:16 PM2015-06-28T23:16:22+5:302015-06-28T23:16:22+5:30

कारखान्यातील राजकारण : जितेंद्र पाटील, लिंबाजी पाटील यांची नावे चर्चेत

Vice-President of 'Krishna' will be got in Walwa taluka | वाळवा तालुक्याला मिळणार ‘कृष्णा’चे उपाध्यक्षपद

वाळवा तालुक्याला मिळणार ‘कृष्णा’चे उपाध्यक्षपद

Next

अशोक पाटील - इस्लामपूर -कृष्णा सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीत वाळवा तालुक्यातून सहकार पॅनेलचे ७ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे कऱ्हाड आणि वाळवा तालुक्यातील बलाबल जवळजवळ सारखेच आहे. वाळवा तालुक्यालाच अध्यक्षपद मिळावे, अशी सभासदांतून चर्चा आहे. परंतु सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांना अध्यक्षपद मिळणार आहे, तर उपाध्यक्ष पदासाठी बोरगावचे जितेंद्र पाटील व तांबवे येथील लिंबाजी पाटील यांच्या नावांची चर्चा आहे.
कृष्णा कारखान्याच्या स्थापनेपासून बोरगावचे माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांच्या घरात संचालकपद आहे. या कारखान्याचे शेअर्स गोळा करण्यातही या घराचा सिंहाचा वाटा आहे. जितेंद्र पाटील हे काँग्रेसचे असले तरी, त्यांचे भोसले घराण्याशी जवळचे संबंध आहेत. स्वत: जितेंद्र पाटील यांनी यापूर्वी कारखान्याचे संचालकपद भूषविले आहे. बोरगाव जि. प. मतदार संघात राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही, त्यांनी जि. प.च्या दोन निवडणुका सहजपणे जिंकल्या आहेत. तसेच कारखान्याची निवडणूकही चांगल्या मताने जिंकली. त्यामुळे त्यांनाच उपाध्यक्षपद मिळावे, अशी मागणी सभासदांतून होत आहे.
कासेगाव जि. प. मतदार संघातील जि. प.चे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनाही उपाध्यक्ष पदाचे वेध लागले आहेत. संधी दिल्यास आपणही हे पद स्वीकारू, असा दावा त्यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यामुळेच जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी त्यांना दिली आहे.
कासेगाव जि. प. मतदार संघात विविध योजनेतून त्यांनी विकासकामे पूर्ण केली आहेत. त्यांचे जनमत चांगले असल्याने त्यांचेही नाव उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी ४ जुलै रोजी होत आहेत. सध्या उपाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत जितेंद्र पाटील, लिंबाजी पाटील असले तरी, अंतिम निर्णय डॉ. सुरेश भोसले घेणार आहेत. याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून आहे.


दोन गटांच्या संघर्षात कर्मचाऱ्यांची होरपळ..!
मोहिते—भोसले यांच्या संघर्षात नेहमीच कामगारांची होरपळ होत आली आहे. त्यामुळे सत्ताबदल झाला की बऱ्याच कामगारांवर उपासमारीची वेळ येते. डॉ. सुरेश भोसले यांनी प्रचारावेळी, कामगारांवर अन्याय केला जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन भोसले यांनी पाळून, कामगारांवर होणारा अन्याय थांबवावा, अशीही मागणी होत आहे.

कार्यपद्धतीत बदल गरजेचा..!
डॉ. सुरेश भोसले कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांना सभासदांना भेटण्यासाठी वेळ नव्हता. त्यांना येणारे दूरध्वनी घेण्यासाठीही त्यांनी कर्मचारी नेमला होता. यामुळेच त्यांना गतवेळच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पुन्हा एकदा सभासदांनी भोसले यांच्यावर विश्वास टाकला आहे. इथून पुढे तरी भोसले यांनी आपल्या कार्यपध्दतीत बदल केल्यास, सभासद त्यांना डोक्यावर घेतील, अशी चर्चा आहे.

Web Title: Vice-President of 'Krishna' will be got in Walwa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.