उपाध्यक्ष शिंपींचा अध्यक्षांकडे निषेधाचा ‘लेटरबॉम्ब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:42+5:302021-09-04T04:30:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध कामांपासून ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध कामांपासून ते बैठकांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये डावलले जात असल्याचा आरोप करत याबाबतचे निषेधाचे पत्रच उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी अध्यक्ष राहुल पाटील यांच्याकडे शुक्रवारी संंध्याकाळी दिले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीला दीडच महिना झाला असताना शिंपी यांच्यासारख्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने ही भूमिका घेतल्याने याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. अध्यक्ष राहुल पाटील हे शुक्रवारी दिवसभर आदर्श शिक्षक मुलाखतींच्या प्रक्रियेत होते. दरम्यान, त्यांच्या दालनामध्ये शिंपी यांनी हे निषेधाचे वैयक्तिक पत्र पाठवून दिले. रात्री ते पाटील यांना मिळाले.
या पत्रामध्ये शिंपी यांनी गेल्या दीड महिन्यात कोणत्या वेळी आपल्याला कसे डावलले गेले याची सविस्तर माहितीच दिल्याचे समजते. शिक्षकांच्या बदल्या, आदर्श पुरस्काराची बैठक, दलित वस्तीच्या निधीच्या वाटपाचा मुद्दा, पुण्याला नुकताच झालेला पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम या कशामध्येही उपाध्यक्ष या नात्याने आपल्याला सहभागी करून घेतले नसल्याचा आरोप शिंपी यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध प्रश्नांबाबत आधी कल्पना दिल्यानंतरही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटायला जातानाही आपल्याला बोलावले जात नसल्याची सल शिंपी यांनी अनेकवेळा याआधी बोलून दाखवली होती. आता तर त्यांनी लेखीच आरोप करत आपला निषेधही नोंदवला आहे. हेच पत्र त्यांनी विविध विषय समित्यांच्या सभापतींनाही पाठवल्याचे सांगण्यात आले.
चौकट
राष्ट्रवादी अंतर्गतही संघर्ष
शिंपी हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सलगीतले नाहीत. त्यामुळे पदाधिकारी निवडीमध्ये शिंपी यांचे नाव सुरुवातीला नव्हते. मात्र, शिंपी यांनी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून थेट शरद पवार यांच्यापर्यंत गाठीभेटी घेतल्या होत्या. परिणामी अखेरच्या टप्प्यात शिंपींना हे पद देण्याचा निर्णय घ्यावा लागला. सध्या आजरा पंचायत समितीच्या राजकारणातही शिंपी यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीच्याच सभापतींवर अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. या सगळ्यात आता शिंपी यांनी थेट अध्यक्षांकडे निषेध व्यक्त केल्याने याचे पडसाद निश्चित उमटण्याची शक्यता आहे. आजऱ्यातही शिंपी आणि स्थानिक राष्ट्रवादीचा एक गट यांच्यात विळ्याभोपळयाचे सख्य आहे. ज्याचे पडसाद जिल्हा बँक निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे.
झेडपी ०१
कोल्हापूर जिल्हा परिषदेत शुक्रवारी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह सभापती शिवानी भोसले, रसिका पाटील, संजयसिंह चव्हाण, आशा उबाळे उपस्थित होत्या.
छाया नसीर अत्तार