कृष्णा नदी प्रदूषणाच्या भोवऱ्यात
By admin | Published: April 17, 2017 12:10 AM2017-04-17T00:10:32+5:302017-04-17T00:10:32+5:30
ग्रामस्थांतून संताप : कृष्णा काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; उपाययोजना राबविण्याची गरज
संतोष बामणे ल्ल उदगाव
गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदीला काळेकुट्ट मळीमिश्रित पाणी आल्याने जलचर प्राणी मृत पावले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा पडल्याने पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे कृष्णाकाठावरील गावांत आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेली व शिरोळ तालुक्याची जीवनदायी असणारी कृष्णा नदी गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गरजेनुसार पाणी वारणा व कोयना धरणातून सोडले जात आहे. सांगली जिल्ह्यातील दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सांगली-कोल्हापूर विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागाने दुर्लक्ष केले आहे. शिरोळ तालुक्यातील सामाजिक संघटनांनी अनेकवेळा आंदोलने करूनही त्याकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांना चालना मिळत आहे.
गेल्या चार दिवसांपासून नदी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नदीत जलपर्णी येत असल्याने हिरवट व काळसर पाणी आले असून, पाण्याला उग्र वास येत आहे. काही ग्रामपंचायतीकडे जलशुद्धीकरण केंद्र नसल्यामुळे नदीतील थेट पाणी नळास येत असल्याने हे पाणी नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे साथीच्या आजाराचा फैलाव होत आहे. तसेच नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.
या गावांना धोका
शिरोळ तालुक्यातील कोथळी, उमळवाड, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, कुटवाड, कनवाड, हसूर, गणेशवाडी, कवठेगुलंद, शेडशाळ, नृसिंहवाडी, आलास, बुबनाळ, बस्तवाड यासह अनेक गावे कृष्णा काठावर वसलेली आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीबरोबरच आता कृष्णा काठावरील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा या गावांतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.