तमदलगे-अंकली रस्ता वादाच्या भोवऱ्यात
By Admin | Published: April 19, 2015 09:23 PM2015-04-19T21:23:46+5:302015-04-20T00:01:44+5:30
काम पूर्ण करण्याचे आव्हान : नुकसानभरपाई, जागेच्या प्रश्नामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
संदीप बावचे - जयसिंगपूर- ३१ मे पर्यंत कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश असले, तरी तमदलगे बसवान खिंड ते अंकली टोलनाका दरम्यानच्या मार्गावरील रस्त्यास अडथळा ठरणारी घरे, निमशिरगावची शाळा यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, आदी प्रश्न प्रलंबित आहेत. याप्रश्नी तमदलगे, निमशिरगाव व जैनापूर येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्त्यांतर्गत बसवान खिंड ते अंकली टोलनाका या दुपदरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. दुपदरी रस्त्याच्या कामासाठी संपूर्ण रस्ता उखडण्यात आला असून, या भागातील जैनापूर, तमदलगे, निमशिरगावमधील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून या खराब रस्त्याचा सामना करीत आहेत. तमदलगेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर अर्धवट पुलाचे बांधकाम झाले आहे, तर तमदलगे गावातील रस्त्यास अडथळा ठरणारी सुमारे ३५ घरे व तीन धार्मिक मंदिरे काढण्याशिवाय पर्याय नाहीत. या घरातील लोकांचे पुनर्वसन होणार की, त्यांना मूल्यांकनाप्रमाणे भरपाई मिळणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. याप्रश्नी गावातील लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अजूनही दखल घेतलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून तमदलगे-जैनापूर-निमशिरगाव मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता उखडल्यामुळे रस्त्यावरील धुळीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. रस्ता सुरळीत नसल्यामुळे जयसिंगपूर-निमशिरगाव एस.टी. व्हाया चिपरीमार्गे येत आहे. चिपरी-जैनापूर रस्त्याचीही अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरून चालत जाणेदेखील मुश्कील बनले आहे. हा रस्ता ठेकेदार कंपनीनेच करून देण्याचे आहे. मात्र, या प्रश्नाकडेही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. जयसिंगपूर रेल्वेस्थानक ते अंकली टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्याचीदेखील अवस्था दयनीय आहे. या रस्त्यावरील ओढ्यावर पर्यायी पूल बांधण्याची गरज आहे. या पुलाच्या बांधकामास अजून सुरुवातच नाही. अनेक समस्यांच्या गर्तेत हा बायपास रस्ता सापडला असताना ३१ मेपर्यंत तो पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.
अपघातास निमंत्रण
बायपास मार्गावर दानोळी व उमळवाड फाटा येतो. मात्र, दुपदरीकरण करीत असताना कोणतेही नियोजन ठेकेदार कंपनीने केलेले नाही. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही फाट्याजवळ दानोळी व उमळवाडहून येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या शक्यता नाकारता येत नाहीत. यामुळे एकतर भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल किंवा सेवामार्ग करणे गरजेचे आहे.
आंदोलनकर्ते गायब
वर्षभरापूर्वी अंकली फाटा ते तमदलगे खिंड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याच्या कामात मातीचा भराव टाकला जात आहे, असा आरोप करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अजूनही रस्त्याची दयनीय अवस्था झाली असतानाही आंदोलनकर्ते मात्र गायब झाले आहेत. त्यामुळे कोणी लोकप्रतिनिधी याप्रश्नी आवाज उठवणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.