अंधश्रद्धेनेच घेतला रमेश मिसाळ यांचा बळी
By admin | Published: July 25, 2014 10:45 PM2014-07-25T22:45:52+5:302014-07-25T22:55:24+5:30
भगतगिरीचा संशय : करणी करत असल्याच्या भीतीने वाडीने टाकला होता बहिष्कार
शिवाजी गोरे -दापोली ,साखरोळी नंबर १ येथील रमेश मिसाळ यांचे कुटुंब झोपेत असताना मंगळवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्याने तालुक्यात खळबळ उडाली. अंधश्रद्धेमुळेच रमेश मिसाळ यांचा बळी गेला असल्याचे समोर येऊ लागले आहे. रमेश मिसाळ हे भगतगिरी करुन करणी करत असल्याचा वाडीतील ग्रामस्थांना संशय होता. त्यामुळे वाडीतील लोकांनी त्या कुटुंबावर अघोषित बहिष्कार टाकला होता.
देवदेवस्की व प्रॉपर्टीच्या वादातून रमेश मिसाळ यांच्यावर तलवारी, कुऱ्हाड, कोयता व चॉपरने वार करण्यात आले होते. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यूही झाला. मोठा मुलगा रुपेश, लहान मुलगा प्रफुल्ल व पत्नी ऋचिता डेरवण येथे उपचार घेत आहेत. या कुटुंबावर अमानूषपणे झालेला हल्ला माणूसकीला काळीमा फासणारा असून, त्यांच्या नातेवाईकाने पूर्वनियोजित कट रचून हा हल्ला केला आहे. जमिनीचा वाद हे वरकरणी कारण दिसून येत असले तरी भगतगिरी करत असल्याचा संशयसुद्धा त्याच्यावर होता.
रमेश मिसाळ हे गावातील बैठकीत, वाडीच्या बैठकीत, सार्वजनिक कार्यक्रमात अंगाऱ्याच्या पुड्या खिशात घेऊन येत असल्याचा अनेकांचा संशय होता. ते भगतगिरी करुन आपल्याला काहीतरी करतील, या भीतीने त्याच्यासह कुटुंबीयांशी कोणीही बोलत नव्हते किंवा त्याच्या वाटेला कोणीही जात नव्हते. ते भगतगिरी करत असल्याचा संशय असल्यानेच त्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला होता. अंगारा, लिंबू घेऊन ते करणी करतात, असा अनेकांचा संशय होता. त्यातच संतोष मिसाळ यांच्या मृत्यूलाही रमेश मिसाळची भगतगिरी कारणीभूत असल्याचा समज आहे. त्यामुळे संतोष मिसाळ यांची पत्नी, मुले यांचा रमेश मिसाळ यांच्या कुटुंबावर राग होता. जमिनीचा वाद हे कारण असले तरी भगतगिरी हेच मुख्य कारण आहे, हेसुद्धा चौकशीत निष्पन्न झाले आहे.
रमेश मिसाळ यांनी करणी करुन अनेकांच्या कुटुंबात विघ्न आणले, असेही या गावातील लोक छातीठोकपणे सांगत आहेत. अशा व्यक्तीला समाजाने मदत करायची नाही, असे ग्रामस्थांनी अलिखित ठरवल्यानेच त्यांच्या घरात हल्ला होत असतानाही मदतीसाठी कोणीही पुढे झाले नाहीत.
रमेश मिसाळ यांचा पाठलाग करुन अमानूषपणे हत्या करणारे आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या संशयित आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. या प्रकरणातील हत्यारे जप्त करण्यात आली असून, आरोपीने फिर्यादीचा खून कशा प्रकारे व कोणत्या कारणासाठी केला, याचे संपूर्ण पुरावे गोळा करण्यात आले आहेत. ज्या काजूची फांदी तोडण्यावरुन वाद झाला त्या जागेचे सर्व कागदपत्र महसूल विभाग तपासून पाहणार आहे. याआधी दहा वर्षांपूर्वीही रमेश मिसाळ यांच्या घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तेव्हा घरात कोणीच नसल्याने अनर्थ ओढवला नाही. आता मात्र या साऱ्यामध्ये रमेश मिसाळ यांचा जीव गेला आहे.
अंधश्रद्धेमुळे एखाद्याचा बळी जाऊ शकतो. कोणाच्या भगतगिरीने काहीही होत नाही. ती केवळ अंधश्रद्धा आहे. परंतु अंधश्रद्धेमुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे.
- अनिश पटवर्धन, तालुकाध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मुलन समिती