मागण्यांची पूर्तता झाल्यास नाशिकमध्ये विजयोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:44+5:302021-06-17T04:16:44+5:30
आम्ही मांडलेल्या आरक्षणासह पाच मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्य सरकारकडून ६ जूनपर्यंत निर्णय झाला नसल्याने मराठा समाजाला कोल्हापुरातील राजर्षी ...
आम्ही मांडलेल्या आरक्षणासह पाच मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्य सरकारकडून ६ जूनपर्यंत निर्णय झाला नसल्याने मराठा समाजाला कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी मूक आंदोलन करावे लागले. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन आपली भूमिका मांडली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारच्यावतीने मला मुंबईत मराठा समाजाच्या पाच मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींसमवेतच्या चर्चेसाठी गुरुवारी येण्याचे निमंत्रण दिले, त्याचे स्वागत करतो. चर्चेला बोलविले याचा अर्थ आम्ही समाधानी झालो असा नाही, या चर्चेसाठी गुरुवारी जाणे आम्हाला शक्य होणार नाही. कारण, आम्ही तयारी करून जाणार आहोत. चर्चेसाठी कधी जायचे याचा निर्णय लवकर घेतला जाईल. या चर्चेतून काय निष्पन्न होणार, हे आम्ही सर्व समन्वयक बघणार आहोत. जर आमच्या मागण्या रास्त पद्धतीने सरकार निकाली लावणार असतील तर त्याचे स्वागत केले जाईल. मात्र, मूक आंदोलनाचे आमचे नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण हे टप्पे ठरले आहेत. पण, मला असा विश्वास वाटतो की, जर सरकारने सर्व प्रश्न मार्गी लावले, मागण्या मान्य केल्यास पुढे मूक आंदोलन राहणार नाही. नाशिकमध्ये आम्ही विजयोत्सव साजरा करू, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
चौकट
लॉंगमार्च काढायला लागू नये
या चर्चेतून काही साध्य झाले नाही तर आम्ही यापूर्वी जाहीर केल्यानुसार पुणे ते मुंबई असा लॉंगमार्च काढला जाईल. हा लॉंगमार्च आम्हाला काढायला लागू नये याची दक्षता घेऊन सरकारने निर्णय घ्यावा, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.