‘कोल्हापूर पोलिस’चा दणदणीत विजय
By Admin | Published: January 4, 2017 12:34 AM2017-01-04T00:34:08+5:302017-01-04T00:34:08+5:30
केएसए चषक फुटबॉल : ‘गोल्ड स्टार स्पोर्टस्’वर ७-० ने मात
कोल्हापूर : आक्रमक खेळाच्या जोरावर ‘केएसए’ चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघाने गोल्ड स्टार स्पोर्टस् असोसिएशनवर ७-० अशा गोलने मंगळवारी मात केली. धडाकेबाज खेळ करीत ‘कोल्हापूर पोलिस’च्या अक्षय व्हरांबळे याने गोलची हॅट्ट्रिक केली.
येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. यातील अंतिम ७ व्या फेरीतील दुसरा सामना मंगळवारी कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ आणि गोल्ड स्टार स्पोर्टस् असोसिएशन यांच्यात झाला. यात सुरुवातीपासून ‘कोल्हापूर पोलिस’ने आक्रमक खेळ केला. त्यांच्या गणेश दाते याने सामन्याच्या २० व्या मिनिटाला मैदानी गोल करून संघाचे खाते उघडले. यानंतर लगेचच दुसऱ्या मिनिटाला आणि ३३ व्या मिनिटाला युक्ती ठोंबरेच्या पासवर सोमनाथ लांबोरे याने चेंडूला गोल जाळीची दिशा दाखवून संघाच्या खात्यात दोन गोलची भर घातली. पूर्वार्धात ‘गोल्ड स्टार स्पोर्टस्’च्या गोलक्षेत्रात चेंडू फिरता राहिला. त्यांच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंकडून काही सोप्या संधी वाया गेल्या. अखेर पूर्वार्धात ‘कोल्हापूर पोलिस’ ३-० अशा गोलने आघाडीवर राहिले. उत्तरार्धात ‘कोल्हापूर पोलिस’ने आक्रमक पवित्रा घेत खेळ सुरू केला. त्यांच्यासमोर ‘गोल्ड स्टार स्पोर्टस्’च्या बचावफळीचा टिकाव लागला नाही. यात ‘कोल्हापूर पोलिस’च्या युवराज गोडसेच्या पासवर युक्ती ठोंबरे याने सामन्याच्या ७३ व्या मिनिटाला गोल करून संघाला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर संघाची विजयाकडील घोडदौड कायम राहिली. यात अक्षय व्हरांबळे याने सामन्याच्या ७६, ७८ व्या मिनिटाला आणि जादा वेळेत मैदानी गोल करून बाजी मारली. समन्वयातील अभावामुळे ‘गोल्ड स्टार’ला एकाही गोलची परतफेड करता आली नाही. त्यांच्या सोमनाथ चौगुले, अवधूत गुरव, शिवतेज पाटील, रविराज भोसले, निखिल साळोखे, आदींच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर ‘कोल्हापूर पोलिस’ संघाने ७-० अशा गोलने विजय मिळविला. सोमनाथ लांबोरे, युवराज गोडसे, विशाल चौगुले, शुभम संकपाळ, आदींनी चांगला खेळ केला. या विजयी संघाने स्पर्धेतील ७ व्या फेरीअखेर एकूण १० गुणांची कमाई केली. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात मंगळवारी ‘केएसए’ चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ व गोल्ड स्टार स्पोर्टस् असोसिएशन यांच्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण.