मुश्रीफ गटाचा आत्मविश्वास दुणावणारा विजय-जिल्हा परिषद विश्लेषण कागल

By admin | Published: February 24, 2017 09:45 PM2017-02-24T21:45:54+5:302017-02-24T21:45:54+5:30

‘भाजप’च्या पदरी निराशा : मंडलिक आणि घाटगे गटाला आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल

The victory of the Mushrif group is a victory-Zilla Parishad analysis Kagal | मुश्रीफ गटाचा आत्मविश्वास दुणावणारा विजय-जिल्हा परिषद विश्लेषण कागल

मुश्रीफ गटाचा आत्मविश्वास दुणावणारा विजय-जिल्हा परिषद विश्लेषण कागल

Next

जहाँगीर शेख -- कागल  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत गतवेळचे सत्ताधारी मंडलिक-संजय घाटगे गट शिवसेना म्हणून एकदिलाने एकत्र येऊन लढत असताना पाच वर्षांपूर्वी शाहू आघाडीच्या माध्यमातून मुश्रीफ गटाबरोबर आघाडी करून निवडणुकीत उतरलेला राजे गट ‘भाजप’ म्हणून स्वतंत्र लढत होता. असे असताना तालुक्यात आ. हसन मुश्रीफ गटाने तीन जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समितीच्या जागा जिंकत तालुक्याच्या राजकारणात प्रबळ असल्याचे सिद्ध करून दाखविले. यामुळे मुश्रीफ गटाचा आत्मविश्वास दुणावणारा हा निकाल ठरला आहे.
कागल पालिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुश्रीफ गटाने हा स्वबळावर दुसरा विजय संपादन केला आहे. विशेष बाब ही की, पाच वर्षांपूर्वी आ. मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी तालुक्यात एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नव्हता. त्या तुलनेत ही कामगिरी मुश्रीफ गटाचा आत्मविश्वास वाढविणारी आहे.
या निवडणुकीत समरजितसिंह घाटगेंनी सर्वांत जास्त आक्रमक प्रचार केला. नवा विचार मांडला. खरे तर प्रचाराचे रान त्यांनीच उठविले. असे असले तरी तालुक्यात भाजपच्या माध्यमातून राजे गटाची बांधणी करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. भविष्यात यशाची पायवाट तयार करणारी ही त्यांची निवडणूक आहे.
संजय मंडलिक गटाने एक जिल्हा परिषद, चार पंचायत समितीच्या जागा जिंकल्या असल्या तरी वीरेंद्र मंडलिकांचा पराभव तोही १८० मतांनी झाला, ही सल या गटाला कायम राहील. तर संजय घाटगे गटाचे अमरीश घाटगे सहज विजयी झाले. ही या गटाला ताकद देणारी बाजू ठरणार आहे; पण पंचायत समितीची एकच जागा जिंकता आली. त्यामुळे संजय मंडलिक आणि संजय घाटगे गटाला आत्मपरीक्षण करायला लावणारा, आमदार हसन मुश्रीफ गटाला आत्मविश्वास देणारा, तर राजे गटाला स्वबळाच्या ‘नाऱ्याला’ बळ देणारा हा निकाल कागल तालुक्यात लागला आहे. यावरून कागलला ‘राजकीय विद्यापीठ’ का म्हणतात, हेच पुन्हा एकदा मतदारांनी स्पष्ट करून दाखविले आहे.


राजे गट आणि तैनात फौज...
राजे गटाचे कार्यकर्ते म्हणजे इंग्रजांच्या तैनाती फौजेसारखे आहेत, अशी टीका होत होती. नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत समरजितसिंह घाटगेंनी स्वबळावर निवडणुका लढवून तैनाती फौज ही संकल्पना मोडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ‘नाव राजे गटाचे पण मदत-पाठबळ दुसरीकडे’ देणाऱ्यांची ‘गोची’ झाली. या गटाने जर कोणाबरोबर युती केली असती तर एखाद दुसऱ्या जागी ‘कमळ’ फुललेही असते; पण गटाचे शुद्धीकरण झाले नसते.
बहुरंगी लढतीचा फायदा-तोटा
तिसरा पर्याय देणाऱ्या भाजपमुळे शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचाही तोटा झाला आहे. तर तालुक्यात करणसिंह घाटगे (वंदूर) यांच्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसचा हात व्होटिंग मशीनवर कायम राहिला. शिवसेनेला भूषण पाटील, बाबगोंडा पाटील यांची भूमिका महागात पडली. हीच स्थिती अमरीश घाटगेंच्या बाबतीत पैलवान रवींद्र पाटील यांनी केली. अशा या तिरंगी लढतीत मुश्रीफ गटाने बाजी मारली आहे.
 

Web Title: The victory of the Mushrif group is a victory-Zilla Parishad analysis Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.