Kolhapur News: ‘कुंभी’त सत्तेचा चौथ्यांदा ‘चंद्रदीप’, सर्व २३ जागांवर दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:49 AM2023-02-15T11:49:17+5:302023-02-15T11:59:03+5:30

दुसऱ्या फेरीत नरकेंची जोरदार मुसंडी

Victory of former MLA Chandradeep Narke in Kumbi Kasari cooperative sugar factory election | Kolhapur News: ‘कुंभी’त सत्तेचा चौथ्यांदा ‘चंद्रदीप’, सर्व २३ जागांवर दणदणीत विजय

Kolhapur News: ‘कुंभी’त सत्तेचा चौथ्यांदा ‘चंद्रदीप’, सर्व २३ जागांवर दणदणीत विजय

googlenewsNext

प्रकाश पाटील/मच्छिंद्र मगदूम

कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी विजयाचा चौकार ठोकला. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘नरके पॅनल’चे सर्व २३ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. सलग चौथ्यांदा सत्ता ताब्यात ठेवत ‘कुंभी’च्या राजकारणावरील आपली पकड घट्ट असल्याचे विरोधकांना त्यांनी दाखवून दिले. ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीने शेवटपर्यंत चिवट झुंज दिली, परंतु त्यांना पराभवाला सामाेरे जावे लागले.

नरके यांच्या ताब्यातील साखर कारखाना काढून घ्यायचाच म्हणून आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी ताकद पणाला लावली. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके व चेतन नरके यांनी विरोधी आघाडीचा थेट प्रचार केल्याने या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होेते. परंतु, सभासदांनी नरके घराण्याकडेच कारखाना सुरक्षित राहू शकेल, या भावनेने मतदान केल्याने एवढ्या अटीतटीच्या लढतीतही चंद्रदीप नरके यांच्याकडे सत्ता कायम राहिली. चंद्रदीप नरके यांना आमदार सतेज पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ताकद मिळाल्याने ही लढाई सोपी झाली. ‘गोकुळ’चे संचालक अजित नरके यांनी गेला महिनाभर केलेल्या पडद्यामागील जोडण्याही यशाला कारणीभूत ठरल्या.

‘कुंभी’साठी रविवारी अत्यंत चुरशीने ८२.४५ टक्के मतदान झाले. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी व गगनबावडा अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. गेले पंधरा-वीस दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने निकालाबाबत कमालीची उत्कंठा होती. मंगळवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात ३५ टेबलांवर मोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत विरोधी शाहू आघाडीने आघाडी घेतली होती.

मात्र, दुसऱ्या फेरीत नरके पॅनलने जोरदार मुसंडी मारत ‘शाहू’ आघाडीचे मताधिक्य कमी करीत, त्यांच्यावर सरासरी ४०० ते ५०० चे मताधिक्य राखत पन्हाळा तालुक्यात प्रवेश केला. तिसऱ्या फेरीतही नरके पॅनलने मताधिक्य कायम ठेवले. निकालानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर व सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले.

चंद्रदीप नरकेंची पकड

स्वर्गीय डी. सी. नरके यांच्या निधनानंतर चंद्रदीप नरके यांनी २००४, २००९, २०१५ व २०२३ अशा चारही निवडणुकीत एकतर्फी सत्ता ताब्यात ठेवली. यावरून त्यांची ‘कुंभी’च्या राजकारणावरील पकड किती घट्ट आहे, हे लक्षात येते.

राजेंद्र सूर्यवंशी यांची शेवटपर्यंत झुंज

दुसऱ्या फेरीअखेर नरके पॅनलने मुसंडी मारली असली तरी विरोधी आघाडीचे राजेंद्र सूर्यवंशी यांनी गट क्रमांक २ मध्ये मताधिक्य कायम राखले होते. कार्यक्षेत्रातील त्यांचा संपर्क व कोरोना काळातील काम सभासदांनी लक्षात ठेवल्याने सूर्यवंशी यांनी चांगली मते घेतली. यामुळे नरके पॅनलचे सर्जेराव हुजरे हे अडचणीत आले होते. मात्र, तिसऱ्या फेरीत त्यांचे मताधिक्य कमी होत जाऊन हुजरे यांना गुलाल लागला.

मतमोजणी यंत्रणेवर ताण

सकाळी सातपासून कर्मचारी मतमोजणीच्या कामात होते. रात्री उशिरापर्यंत मोजणीचे काम सुरू राहिल्याने कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण जाणवत होता. तरीही निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व सहायक प्रदीप मालगावे यांनी नेटके नियोजन केल्याने विनातक्रार मोजणीची प्रक्रिया पार पडली.

नऊ तासांनंतर पहिली फेरी पूर्ण

पहिली फेरी पूर्ण होण्यास तब्बल नऊ तास लागले. नऊ मतपत्रिका आणि क्रॉस व्होटिंगमुळे मोजणीला विलंब लागत होता. त्यानंतर मात्र दुसरी व तिसरी फेरी गतीने पूर्ण झाली.

पहिल्या फेरीत ‘शाहू’ आघाडी पुढे

पहिल्या फेरीत कुडित्रे, वाकरे, काेपार्डे, कळंबे तर्फ ठाणे, भामटे, चिंचवडे, सांगरुळ, म्हारुळ, आमशी, खाटांगळे, पासार्डे, कसबा बीड, गणेशवाडी, सावरवाडी, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला या गावांतील मोजणी करण्यात आली. यामध्ये विरोधी शाहू आघाडीचे २१ उमेदवार आघाडीवर राहिले. सत्तारूढ आघाडीचे चंद्रदीप नरके व कृष्णात कांबळे यांनी आघाडी घेतली.

दुसऱ्या फेरीत नरकेंची जोरदार मुसंडी

दुसऱ्या फेरीत चाफोडी, आरळे, घानवडे, महे, कोगे, खुपीरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वरणगे, पाडळी बुद्रुक, दोनवडे, शिंगणापूर, पाडळी खुर्द, यवलूज, माजगाव, आळवे, पुनाळ या गावांतील मोजणी करण्यात आली. यामध्ये नरके पॅनलने जोरदार मुसंडी घेत विजयाकडे आगेकूच सुरू ठेवली.

रात्री अकरानंतरच गुलाल

मतमोजणीला विलंब होत असल्याने निकालाबाबत लवकर अंदाज येत नव्हता. त्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेल सुरू होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे मंगळवारी दिवसभर फोन खणखणत होते. रात्री अकरानंतर विजयाचा अंदाज आल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

Web Title: Victory of former MLA Chandradeep Narke in Kumbi Kasari cooperative sugar factory election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.