शिवसैनिकांच्या एकजुटीचा विजय निश्चित
By Admin | Published: October 21, 2015 12:33 AM2015-10-21T00:33:54+5:302015-10-21T00:40:58+5:30
विनायक राऊत : शिवसेनेच्या अद्ययावत प्रचाराला प्रारंभ; भाजपला मूठमाती द्या
कोल्हापूर : शिवशाहीच्या तुतारीचा निनाद, कडकडणारी हलगी, ‘शिवसेना-शिवसेना’ची अंगात शिरशिरी आणणारी धून अशा वातावरणात शिवसेना उमेदवारांच्या अद्ययावत प्रचारयंत्रणेचा प्रारंभ झाला. येथील कोटितीर्थ तलावानजीकच्या श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवसैनिकांनी एकजूट केल्यास महापालिकेवर भगवा निश्चितच फडकेल, असा विश्वास यावेळी करण्यात आला. निवडणुकीत अभद्र युती करणाऱ्या भाजपला मूठमाती देण्याची वेळ आल्याचाही इशारा यावेळी खासदार राऊत यांनी दिला.
या अद्ययावत प्रचार यंत्रणेत १० व्हिडिओ रथ, दोन सभेचे शिवरथ, प्रचारांच्या रिक्षा, आदींद्वारे प्रचार करण्यात येणार आहे.
येथील स्वामी समर्थ मंदिरात देवदर्शन घेऊन शिवरथासमोर प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी शिव जयघोष करण्यात आला. प्रचार प्रारंभप्रसंगी खा. राऊत यांनी, भाजपवर टीकास्त्र सोडले. याशिवाय गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीने भ्रष्ट कारभार केल्याने जनताच त्यांना उत्तर देईल, जिल्ह्यातील काँग्रेस पूर्णत: संपल्याने त्यावर न बोललेलेच बरे, अशा शब्दांत त्यांनी तिघा विरोधकांचा समाचार घेतला. प्रास्ताविकात आमदार राजेश क्षीरसागर यांनी, ‘मातोश्री’वरून आलेल्या आदेशाचे पालन करून महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त शिवशाहीचे प्रशासन आणू, असे सांगितले. काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे, त्यांनी वेळीच आपली उमेदवारी मागे घेऊन पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही एकजुटीने शिवशाहीचा विजय संपादन करू, असे सांगितले. याप्रसंगी शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, प्रा. विजय कुलकर्णी, मुरलीधर जाधव, अॅड. पद्माकर कापसे, आदी उपस्थित होते. सर्व उमेदवार तसेच शिवसैनिक डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवा स्कार्प अडकवून, तर काहीजण अंगात भगवे कपडे घालून प्रचारयंत्रणेत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)