Video : गिरीश महाजनांचा 'हौशी' पूरदौरा, सेल्फी स्टंटचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 11:29 AM2019-08-09T11:29:27+5:302019-08-09T11:44:09+5:30
कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती पाहून अवघा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे.
कोल्हापूर - जलंसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची असंवेदनशीलता एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेल्या गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पर्यटन सहलीलाच निघाले की काय, अशा अविर्वावात फिरताना दिसत आहेत. गिरीश महाजन यांच्योसोबत काही कार्यकर्ते आणि पोलीसही या बोटीवर असल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती पाहून अवघा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. त्यातच, सांगलीतील बोट दुर्घटनेत जवळपास 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांचे स्थलांतर झाले आहे. पूरग्रस्त लोकांना राज्यभरातून मदत पुरविण्यात येत असून अन्न आणि निवाऱ्याची सोय करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याला भेट देत, पूरस्थितीची हवाई पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बचत आणि मदतकार्य जोमाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित होते. मात्र, या पाहणी दौऱ्यात गिरीश महाजन यांनी बोट सफर केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गिरीश महाजन यांच्या या पाहणी दौऱ्यातील व्हिडीओवरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. पूरस्थितीची पाहणी करताय की पूर पर्यटन करताय ? असा सवाल नेटीझन्स विचारत आहेत. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोटीवर सफर झाल्यानंतर कॅमेऱ्याकडे पाहात हात हालवून अभिवादन करताना मंत्री गिरीश महाजन दिसत आहेत. महाजन यांच्यासमवेत असलेली व्यक्ती व्हिडीओ आणि शूट करताना दिसत आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांच्या कृत्याचा आणि व्हिडीओचा विरोधकांकडून निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकार संवेदनशील नसल्याचे म्हटले आहे. तर, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही सरकार गंभीर नसल्याचे म्हटले. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनीही महाजन यांच्यावर टीका करताना, ही वेळ स्टंटबाजी करण्याची नाही, हे तरी भान पाहिजे होतं, असं म्हटलं आहे.