Video : 'माझा साहेब खरा हाय', धाड पडल्यानंतर मुश्रीफांच्या घराबाहेर वृद्ध महिलेचा टाहो...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 06:15 PM2019-07-25T18:15:32+5:302019-07-25T18:15:43+5:30
मुश्रीफ यांच्या घरावर छापा पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर मोठी गर्दी केली आहे.
कोल्हापूर - कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी गुरुवारी सकाळी आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकल्या. तब्बल पंधरा जणांचे पथक त्यांच्या घरातील विविध कागदपत्रांची माहिती घेत होते. मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाची धाड पडल्याचं समजताच मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. मोठ्या जल्लोषात मुश्रीफ यांचे समर्थन करत घराबाहेर बोलावून त्यांचा सत्कारही केला.
मुश्रीफ यांच्या घरावर छापा पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर मोठी गर्दी केली आहे. मुश्रीफ यांच्या घरासह त्यांचा माद्याळ ता. कागल येथील खासगी साखर कारखाना, त्यांच्या पुण्यातील मुलाचे घर व टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्याही घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याने खळबळ उडाली. आपल्या नेत्याच्या घरावर पडलेली धाडीची बातमी समजतात भावूक होऊन कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांचे घर गाठले. विशेष म्हणजे, या गर्दीत दोन वृद्ध महिलाही आल्याचं पाहायला मिळालं. मुश्रीफ यांच्या घराबाहेर आलेल्या या दोन्ही महिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तर, एक महिला मोठ-मोठ्यानं माझा साहेब देव आहे, माझा साहेब खरा माणूस हाय. मी आजारीय तरीभी इकडं आलीय, असे म्हणत या महिल्या रडत होत्या. मुश्रीफ यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओ -
दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी भाजपा प्रदेध्याध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याची जाहीर समारंभात ऑफर दिली होती. पण, त्यांनी त्यास नकार देऊन शरद पवार हेच आपला देव असल्याचे सांगून कर्नाटकात एकेक आमदाराला खरेदी करण्यासाठी ७० कोटी रुपये भाजपाने दिले असून, हा पैसा आला कोठून अशी विचारणा केली होती. त्याचा परिणाम म्हणूनच ही कारवाई झाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.