नेत्यांची जीभ घसरली.. प्रचारात रंगत आली; मतदारांचीही होतीय चांगलीच करमणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 02:23 PM2024-11-15T14:23:02+5:302024-11-15T14:23:34+5:30

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना अनेक मतदारसंघांत गमतीजमती झाल्या आहेत. त्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्या असून, त्यातून ...

Video of leaders' wrong statements during assembly election campaign in Kolhapur goes viral | नेत्यांची जीभ घसरली.. प्रचारात रंगत आली; मतदारांचीही होतीय चांगलीच करमणूक

नेत्यांची जीभ घसरली.. प्रचारात रंगत आली; मतदारांचीही होतीय चांगलीच करमणूक

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना अनेक मतदारसंघांत गमतीजमती झाल्या आहेत. त्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्या असून, त्यातून मतदारांचीही करमणूक होत आहे. भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांचे लाडक्या बहीण योजनेबाबतचे विधान तर राज्यभर प्रचाराच्या केंद्रस्थानी आले. महाविकास आघाडीला या योजनेपासून बचाव करण्यासाठी हे विधान चांगलेच मदतीला धावून आले.. तशीच काही विधानेही चर्चेत आली आहेत.

  • खासदार महाडिक यांच्या विधानाची हवा अजून ताजी असतानाच तिसंगी जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्य मेघाराणी जाधव यांचे गारिवडे येथील सभेतील विधानही वादग्रस्त बनले आहे. बायकांनो तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही आता जाताना सांगायचे आहे की, धनुष्यबाणालाच मतदान करायचे आहे आणि नाही केलेसा आणि इकडं तिकडं काही केल्याचे कळालं तर लाडकी बहीण योजनेचे सरकारने १५०० रुपये दिल्यात, पण तुमच्याकडून तीन हजार रुपये वसूल करणार, असं त्या म्हणाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
  • कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार प्रणिती शिंदे यांची सभा शनिवारी उजळाईवाडीत झाली. तशी ही सभा महाडिक यांच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवल्यानेच गाजली होती. परंतु, सभा संपल्यावर सूत्रसंचालन करणारा म्हणाला की, महिलांची जेवणाची व्यवस्था केली आहे, त्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नये.. दोन-तीन सेकंदाचीच ही घोषणा आहे. लग्नात अक्षता पडल्यावर पाहुणे मंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नये अशा स्वरूपाची. परंतु, ती फारच गाजली. विरोधी उमेदवार अमल महाडिक यांनी आपल्या फेसबुक पेजवर ती व्हायरल केली. शौमिका महाडिक यांनीही एका सभेत त्यावरून टीका केली.
  • कोल्हापूर उत्तरमध्ये तर फारच गमतीजमती होत आहेत. कारण दोन्ही उमेदवार एकाच राजेश नावाचे आहेत. एका प्रचार सभेत महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी १७ तारखेला आम्ही राजेश लाटकर यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याची घोषणा करून टाकली आहे. नंतर त्यांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी लाटकर नव्हे नव्हे.. क्षीरसागर असे सांगण्याचा प्रयत्न केला.
  • शिंदेसेनेचे युवा नेते विरेंद्र मंडलिक हल्ली कर्तृत्वापेक्षा त्यांच्या भाषणानेच जास्त चर्चेत आहेत. त्यांनी अगोदर कागलमध्ये शाब्दीक बॉम्ब फोडला.. कोल्हापुरात राजेश क्षीरसागर यांच्या सभेत बोलताना त्यांनी उगीचच अवघड विधान केले. शिवाजी पुलावर ऐतिहासिक संग्रहालयाचे काम रखडले आहे. मला आता राजेश क्षीरसागर हे निवडून येतील, अशी खात्री वाटत नाही.. त्यामुळे नवीन आमदारांनीच हे काम करावे, असे त्यांनी सांगून टाकले. त्या सभेतील व्यासपीठावरील कार्यकर्त्यांच्या ध्यानात ही बाब आल्यावर त्यांना कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आली.
  • वक्तव्याप्रमाणेच काही नेत्यांच्या भूमिकाही या निवडणुकीत चर्चेच्या ठरल्या आहेत. इंडिया आघाडीचे समन्वयक असलेले संपत देसाई कागलमध्ये समरजित घाटगे यांच्या प्रचारात आहेत आणि चंदगडला मात्र ते काँग्रेस बंडखोर अप्पी पाटील यांच्या प्रचारात पुढे आहेत.
  • कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करून विजयी झालेल्या काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव या निवडणुकीत मात्र राज्यात महायुती सरकारच्या काळातच चांगली कामे झाली, अशी भाषणे करत आहेत.
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी करवीर मतदारसंघात काँग्रेसच्या राहुल पाटील यांना पाठिंबा दिला आहे आणि त्या पक्षाचे दुसरे नेते प्रा. जालंदर पाटील मात्र त्याच मतदारसंघात वडिलांनंतर मुलाला आमदारकी द्यायला ती काय सरकारी नोकरी आहे का? अशी विचारणा करत शिंदेसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारात पुढे आहेत.

Web Title: Video of leaders' wrong statements during assembly election campaign in Kolhapur goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.