Kolhapur: लक्ष्मीपुरीत हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल, आठ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:23 PM2024-07-10T12:23:10+5:302024-07-10T12:23:56+5:30

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद : पोलिसांची उडाली तारांबळ

Video of scuffle in Laxmipuri goes viral, eight people arrested in Kolhapur | Kolhapur: लक्ष्मीपुरीत हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल, आठ जणांना अटक

Kolhapur: लक्ष्मीपुरीत हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल, आठ जणांना अटक

कोल्हापूर : दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लक्ष्मीपुरीत फोर्ड कॉर्नर येथे दुचाकी अडवून आठ जणांनी एकमेकांना हाणामारी केली. सोमवारी (दि. ८) रात्री दहाच्या सुमारास झालेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांनी तातडीने संशयितांची ओळख पटवून गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.

अमोल रमेश पोवार, वैभव विनोद पोवार, सुजल अशोक पोवार, कुणाल प्रकाश पोवार (सर्व रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) यांच्यासह जावेद सिकंदर मुल्ला, सुलतान असकरअली सय्यद, आसीफ यासीन शेख (तिघे रा. सरनाईक वसाहत) आणि जुनेद जावेद शेख (रा. जवाहरनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ओळख पटवून संशयितांना अटक केली. लक्ष्मीपुरी पोलिसांकडे त्यांचा ताबा दिला असून, भारतीय न्याय संहिता कलम १९४-२, १८९-१,२ आणि १९० नुसार गुन्हा दाखल केला.

सोमवार पेठेतील अमोल पोवार हा तरुण मित्रासोबत केर्ली (ता. करवीर) येथे जेवणासाठी गेला होता. परत येताना दोन दुचाकींवरील अनोळखी तरुणांनी त्याला शिवीगाळ केली. याचा राग मनात धरून पोवार याने सोमवार पेठेतील तरुणांना फोन केला. पाठलाग करत लक्ष्मीपुरी येथील फोर्ड कॉर्नर येथे दुचाकी आडवी मारून शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना अडवले. तिथे दोन्ही गटांत हाणामारी झाली. चार-पाच मिनिटांत दोन्ही गट निघून गेले होते.

व्हायरल व्हिडीओने खळबळ

हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता, तसेच पोलिस वेळेत पोहोचले नसल्याचा आरोप केला जात होता. याची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षकांनी तातडीने दोषींचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना अटक केली.

Web Title: Video of scuffle in Laxmipuri goes viral, eight people arrested in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.