Vidhan sabha 2019 : केंद्रीय नेतृत्वाचे वेगळे गणित! कोथरूडबाबत चंद्र्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 05:23 AM2019-10-02T05:23:46+5:302019-10-02T05:24:08+5:30
मला केंद्रीय नेतृत्वाने पुण्यातून निवडणूक लढवायला सांगितले. कदाचित केंद्रीय नेतृत्वाच्या मनामध्ये भविष्यातील काही गणित असेल
कोल्हापूर : मला केंद्रीय नेतृत्वाने पुण्यातून निवडणूक लढवायला सांगितले. कदाचित केंद्रीय नेतृत्वाच्या मनामध्ये भविष्यातील काही गणित असेल, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मुख्यमंत्री पदाशी त्यांच्या या वक्तव्याचा संबंध जोडला जात आहे.
पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, केंद्रीय नेतृत्वाने मला निवडणूक लढवायला सांगितली. कोल्हापुरातील दोन आमदारांपैकी कुणाला ‘तुम्ही थांबा’ असे सांगणे योग्य नव्हते. त्यामुळे पक्षाने माझ्यासाठी ही जागा शोधली; कारण कोथरूड मतदारसंघातून लोकसभेला दीड लाखाचे मताधिक्य मिळाले होते.
मी १९८२ पासून पुण्यात जात आहे. १३ वर्षे संघटनमंत्री, पुुणे मुख्य जिल्हा असलेल्या पाच जिल्ह्याचा पदवीधरचा १० वर्षे आमदार, पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशा विविध भूमिकांतून मी पुण्याशी सातत्याने संबंधित आहे. कोथरूडच्या गल्लीबोळांत माझे परिचित लोक आहेत. त्यामुळे पुणेकर मला परका मानणार नाहीत, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
भविष्यातील गणित काय ?
‘केंद्रीय नेतृत्वाच्या मनात भविष्यातील गणित असेल,’असे खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच सांगितल्याने पाटील यांची निवडणुकीनंतर पदोन्नती होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. पुण्यातीलच एका कार्यक्रमामध्ये ‘मुख्यमंत्रिपद मिळाले तर सोडतो की काय?’ असे पाटील म्हणाले होते.