Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रांवर मोबाइला बंदी, लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात ११ जणांवर गुन्हे
By उद्धव गोडसे | Published: November 11, 2024 04:40 PM2024-11-11T16:40:40+5:302024-11-11T16:41:24+5:30
निवडणूक कर्मचाऱ्यांवरही होणार कारवाई
उद्धव गोडसे
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर मतदान करताना काही जणांनी मोबाइलवर ईव्हीएमचे चित्रीकरण केले होते. ते व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग झाला होता. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर मतदारांना मोबाइलसह प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.
मतदान प्रक्रिया गोपनीय ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी मतदान केंद्रांवर मोबाइलसह प्रवेश दिला जात नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मतदार थेट ईव्हीएमपर्यंत मोबाइल घेऊन गेले. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करून ते व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या स्टेटसला ठेवले. सोशल मीडियात व्हायरल केले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी ११ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना चौकशीसाठी बोलावले.
मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत असे प्रकार टाळण्यासाठी मतदारांना मतदान केंद्राबाहेरच मोबाइल ठेवावा लागणार आहे. याची खबरदारी केंद्रावरील निवडणूक कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांना घ्यावी लागणार आहे..
कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
मतदान केंद्रात मोबाइलसह मतदार येणार नाहीत, यासाठी निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. मतदारांना सूचना देणे, त्यांना बाहेरच मोबाइल ठेवण्यास सांगणे, तपासणी करण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे. अन्यथा कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले जाणार आहे.
नेते, कार्यकर्त्यांचा अगाऊपणा
सर्वसामान्य मतदार सूचनांचे पालन करतात. नेते आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र नियम डावलून कर्मचारी, अधिकाऱ्यांना दमदाटी करतात. लोकसभा निवडणुकीत नेत्यांच्या जवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी मतदानाचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले होते. आपण नेत्याशी, उमेदवाराशी किती प्रामाणिक आहे, हे दाखवण्याच्या प्रयत्नात असे प्रकार घडतात.
दंडात्मक कारवाई
मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग केल्याचे सिद्ध झाल्यास दोषींना आर्थिक दंड होऊ शकतो. तसेच पोलिसांकडून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई होऊ शकते. कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी गोपनीयतेचे पालन करा, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.