पाणी आटल्याने पंचगंगा काठावरील प्राचीन मंदिरांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:44 PM2019-06-12T14:44:50+5:302019-06-12T15:13:03+5:30
कोल्हापूरात पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने अनेक वर्षापासून पाण्यात असलेली अनेक प्राचीन मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. काळानुरुप आणि गाळ साठत राहिल्याने नदीचा मार्ग बदललेला असून दीडशे वर्षापासून साठलेला हा गाळ काढल्यास नदी मूळ मार्गाने प्रवाहित होईल, असे मत मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरात पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने अनेक वर्षापासून पाण्यात असलेली अनेक प्राचीन मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. काळानुरुप आणि गाळ साठत राहिल्याने नदीचा मार्ग बदललेला असून दीडशे वर्षापासून साठलेला हा गाळ काढल्यास नदी मूळ मार्गाने प्रवाहित होईल, असे मत मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.
पंचगंगा नदीचा मार्ग अग्नेय दिशेला सरकल्यामुळे पूर्वी नदीच्या काठावर असणारी विविध प्राचीन मंदिरे पाण्यात गेली आहेत. शिवाजी पूल जेव्हा बांधण्यात आला, तेव्हाचा आराखडा उपलब्ध आहे. त्यावेळी जो मार्ग होता, त्या मार्गाने नदी पूर्ववत वाहू लागली तर आता पाण्यात असलेल्या मंदिरांना धोका पोहोचणार नाही.
गेल्या अनेक वर्षात या नदीचा मार्ग बदलत गेला आहे. पाण्याच्या चक्राकार प्रवाहामुळे नदीसोबतचा माती आणि अन्य वस्तूंचा गाळ वायव्य दिशेला साठत गेला आहे. तो भराव हळूहळू इतका मोठा झाला की, नदी त्याला वळसा घालून पुढे जाउ लागली. त्यामुळे पूर्वी काठावर असणारी प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
तत्कालीन कागदपत्रे, जुनी छायाचित्रे, चित्रकार आबालाल रेहमान आणि इतरांनी काढलेल्या चित्रांमध्ये या नदीचा मूळ प्रवाह आणि काठावरील मंदिरे दिसून येतात. पूल बांधल्यानंतर झालेला बंधारा आणि काठावरील मंदिरांना पूर्वी धोका नव्हता, मात्र हळू हळू गाळामुळे ही मंदिरे पाण्यात गेली असे मत उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.
सुस्थितीत असलेल्या यातील काही मंदिरांचा जीर्णोध्दार करण्याची गरज आहे. परंतु तत्पूर्वी नदीपात्रात साठलेला गाळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे. अन्यथा या मंदिरांची दुरुस्ती केली तरी ही मंदिरे पुन्हा पाण्यातच राहून नष्ट होतील, असे मत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.
३0 ते ३५ प्राचीन मंदिरांचे दर्शन
पंचगंगा नदीच्या काठावर अंदाजे ३0 ते ३५ प्राचीन मंदिरे बांधली गेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मयुरेश्वर (कार्तिक स्वामी), ब्रम्हदेव, दशाश्वमेधेश्वर यासारखी दुर्मिळ मंदिरे आहेत. याशिवाय अनेकांची समाधीस्थळे, छत्रपतींच्या देवांची मंदिरे या परिसरात आहेत. पाण्याखाली गेल्यामुळे मयुरेश्वर मंदिराची झीज होत आता केवळ चबुतरा शिल्लक आहे.
पायथे, चबुतरे, बैठका, दीपमाळा, शिलालेख
यासह अनेक अज्ञात मंदिरे, त्यांचे पायथे, चबुतरे, बैठका, दीपमाळा तसेच काही शिलालेखही पहायला मिळतात. यातील अनेक मंदिरे ढासळली आहेत. घाटावरच्या मागील बाजूस असलेली काही मंदिरेही ढासळलेली आहेत. याचा अभ्यास केल्यास नवीन माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.