नेत्रदानाच्या संकल्पनेला उदासीनतेची दृष्ट

By admin | Published: June 10, 2015 12:20 AM2015-06-10T00:20:53+5:302015-06-10T00:27:02+5:30

मृत्यूनंतर नातेवाईकांकडून विरोध : नेत्रदात्यांची संख्या २५ वर्षांत हजाराच्या आतच, नेत्रदान नगण्यच

View of depression on the idea of ​​Netrodan | नेत्रदानाच्या संकल्पनेला उदासीनतेची दृष्ट

नेत्रदानाच्या संकल्पनेला उदासीनतेची दृष्ट

Next

संदीप खवळे- कोल्हापूर -आधुनिकीकरणाच्या वाटेवर वेगाने चालणारा समाज आजही नेत्रदान करण्याबाबत उदासीन आहे़ नेत्रदानासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने नोंदणी होते़ परंतु, हा संकल्प करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानासाठी नातेवाइकांकडून आणि नागरिकांकडूनच विरोध होत असल्यामुळे नेत्रदानाचा आकडा गेल्या २५ वर्षांत हजाराच्या आतच घुटमळत असल्याचे चित्र आहे़ शहरातील नेत्रपेढ्यांमध्ये दृष्टिप्राप्तीसाठी प्रतीक्षा यादी आहे़ आज, बुधवारी ‘जागतिक नेत्रदान दिन’ आहे़ या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख नेत्रपेढ्यांशी संपर्क साधला असता, नेत्रदानाचा संकल्प उदासीनतेच्या दृष्टीत अडकल्याची माहिती संबंधितांनी दिली़
मृत्यूनंतर अग्नीसोबत डोळेही भस्मसात होतात; पण हेच नेत्र दान केले तर दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना या सृष्टीचे दर्शन होईल़ अंध व्यक्तींना सृष्टीच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवण्यासाठी मृत व्यक्तींचे नेत्र उपयुक्त ठरतात़ हे नेत्र चार तासांच्या आत काढले, तर अंध व्यक्तींसाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो़ परंतु, नेत्र काढणे म्हणजे मृतदेहाची विटंबनाच, ही भावना आजही समाजामध्ये आहे़ अंधश्रद्धेपोटी नेत्रदानाला विरोध केला जातो़ परिणामी, आज नेत्रांची मागणी आणि पुरवठा यात प्रचंड तफावत आहे़ येथील कोल्हापूर नेत्रदान पेढीमध्ये दर महिन्याला सरासरी दहाजण प्रतीक्षा यादीमध्ये असतात; पण दोघांनाच नेत्र उपलब्ध होतात़
दरवर्षी हजारोंच्या संख्येने नोंदणी होते; पण नेत्रदानाचा संकल्प केलेली व्यक्ती मृत झाल्यानंतर डॉक्टर तेथे गेल्यास कुटुंबीयांकडून विरोध होतो़ कुटुंबातील सदस्यांची तयारी असते; मात्र अन्य नातलगांकडून विरोध होतो. नोंदणीच्या तुलनेत नेत्रदानासाठी नगण्य प्रतिसाद आहे़ २५ वर्षांत आमच्याकडे सुमारे सहा हजारांची नोंदणी झाली़ पैकी अंदाजे ८५० नेत्रदान झाले आहे़ मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे, अशी माहिती सर्वमंगल सेवा संस्था संचलित कोल्हापूर नेत्रपेढीचे सचिव चंद्रकांत मेहता यांनी दिली़
डॉ़ अतुल जोगळेकर म्हणाले, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे नेत्र अंध व्यक्तीला पूर्वी २४ तासांत बसवणे आवश्यक होते़ परंतु, ‘एमकेमेडिया’ या तंत्रज्ञानामुळे मृतदेहाचे नेत्र काढल्यानंतर ते चार दिवसांपर्यंत अन्य अंध व्यक्तीला बसवले जाऊ शकतात़ कॅन्सर, एचआयव्ही आणि कावीळ हे आजार असलेल्या व्यक्तींचे नेत्र घेतले जात नाहीत़ अपघातामध्ये डोळ्याला इजा होऊन दृष्टी गेलेल्या व्यक्तींना किंवा कॉर्निया अपारदर्शक झालेल्या व्यक्तींना नेत्रदानामुळे दृष्टी प्राप्त होते़ त्यासाठी मेंदू आणि डोळा यामधील शिरा कार्यरत असणे आवश्यक आहे़ नेत्ररोपणानंतर २४ तासांनी दिसू लागते़

लहानपणापासून मला कमी दिसत होते़ कॉर्निया अपारदर्शी झाल्यामुळे ही समस्या होती़ वयाची साठी ओलांडल्यानंतर खूपच अंधुक दिसू लागले़ त्यामुळे २०११ मध्ये कोल्हापुरात नेत्ररोपण करून घेतले़ नेत्ररोपणानंतर डोळ्यांवरची पट्टी काही तासांनी उघडताच सभोवतालचे स्पष्ट दिसू लागले अन् एक वेगळे समाधान अनुभवले़ कुणीतरी केलेल्या नेत्रदानामुळे मला हा आनंद अनुभवता आला़ नेत्रदानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
- विद्या गोखले, मालवण.

Web Title: View of depression on the idea of ​​Netrodan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.