सभापती निवडीकडे सदस्यांच्या नजरा
By admin | Published: March 6, 2017 12:39 AM2017-03-06T00:39:48+5:302017-03-06T00:39:48+5:30
शिरोळ पंचायत समिती : सत्ता कोण स्थापन करणार याचीच उत्सुकता
संदीप बावचे ल्ल शिरोळ
शिरोळ पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्यामुळे आकड्यांच्या गणिताचा खेळ सुरू आहे. शिवसेना-भाजपमुळे स्वाभिमानी पक्षाची तालुक्यात पीछेहाट झाल्यामुळे या दोन्ही पक्षांना रोखण्यासाठी स्वाभिमानी दोन्ही काँग्रेससोबत आघाडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर शिवसेना-भाजपपेक्षा स्वाभिमानी बरी अशी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका असल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या तीन जागा भाजपला, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व स्वाभिमानीला प्रत्येकी एक जागा मिळाली. पंचायत समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सहा, स्वाभिमानी चार, शिवसेना दोन, तर भाजप व अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सत्ता स्थापन करण्याचे त्रांगडे आजही कायम आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी पीछेहाट झाली. शिवसेना व भाजपने स्वाभिमानीच्या जागा खेचून आणल्या. पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी आठ हा बहुमताचा आकडा पार करावा लागणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे सहा सदस्यसंख्या आहे, तर स्वाभिमानीकडे चार सदस्य संख्या असून, दोन्ही काँग्रेसला दोन, तर स्वाभिमानीला चार सदस्यांची गरज आहे.
विधानसभेनंतर तालुक्यात टोकाचे राजकारण सुरू आहे. जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ या निवडणुकांमध्ये हा परिणाम दिसून आला. स्वाभिमानी हा केंद्र व राज्यात भाजपचा मित्रपक्ष असला तरी शिरोळमध्ये भाजपला एकच जागा मिळाली आहे. त्यामुळे बलाबल होऊ शकत नाही. दोन्ही काँग्रेसला शिवसेनेची साथ मिळणार अशीही चर्चा होती. मात्र, ही चर्चादेखील धुसर बनली आहे.
शिवसेना व भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेससह स्वाभिमानी शिरोळ पंचायत समितीच्या सत्ता स्थापनेत एकत्र येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेस व स्वाभिमानी यांच्यात बोलणी सुरूअसल्याचे समजते. एकूणच सभापती निवडीकडे नूतन
सदस्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.