मतदार नोंदणीने निवडणुकीचा ‘श्रीगणेशा’
By admin | Published: October 1, 2015 12:10 AM2015-10-01T00:10:00+5:302015-10-01T00:44:17+5:30
एकसदस्यीय प्रभाग रचनेकडे लक्ष : ई-इलेक्शनमुळे इच्छुकांची दमछाक होणार
संदीप बावचे-जयसिंगपूर --नोव्हेंबर २०१६ मध्ये होणाऱ्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्यावेळच्या संभाव्य लोकसंख्येला अनुसरून प्रभाग रचना तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर या निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीचा अवलंब होणार असल्याचे संकेत आहेत. त्यातच राज्यात यापुढे ई-इलेक्शन पद्धतीने निवडणुका होणार असल्याचेही संकेत आहेत. दरम्यान, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १ आॅक्टोबरपासून मतदार यादी नोंदणी कार्यक्रमाबरोबर मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू होणार आहे. एकूणच मतदार यादी कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणुकीचा ‘श्रीगणेशा’ झाला आहे.डिसेंबर २०१६ मध्ये येथील नगरपालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासनाला कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त आहे. याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जयसिंगपूर शहरातील लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना करण्याकरिता प्रारूप नकाशा गुगल मॅपवर टाकण्यासाठी एप्रिल २०१५ मध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या दहा वर्षांत वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता शहरातील नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. लोकसंख्येच्या आराखड्यानुसार तीन स्वीकृत नगरसेवक, असे मिळून २८ च्यावर नगरसेवकांची संख्या पोहोचणार आहे. नवीन होणारी प्रभाग रचना, प्रभागाचा अनुक्रम कोणत्या प्रकारे असावेत, याबाबत मात्र शासनाने गोपनीयता पाळली आहे.
राज्यात यापुढे ई-इलेक्शन पद्धतीने निवडणुका होण्याचे संकेत आहेत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्याची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आॅनलाईन अर्ज स्वीकारणे, गुगल मॅपवर प्रभाग रचना तयार करणे, प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यासाठी खास सॉफ्टवेअर, निवडणुकींमध्ये अधिकाधिक संगणकीय तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न यापुढे होणार आहे. दरम्यान, १ आॅक्टोबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर झाला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्ययावतीचे काम शासनाकडून सुरू झाले आहे. यामुळे नगरपालिका निवडणुकीचा मतदार नोंदणी कार्यक्रमाच्यानिमित्ताने श्रीगणेशा झाला आहे.