संचालकांच्या प्रवास भत्त्यावर जोरदार चर्चा

By admin | Published: September 18, 2016 12:34 AM2016-09-18T00:34:57+5:302016-09-18T00:35:56+5:30

शेतकरी संघाची सभा : बदनामीबद्दल ‘गोकुळ’चा निषेध; बैल छाप मिश्रखत, औषध दुकान, पेट्रोल पंप सुरू करण्याची मागणी

Vigorous discussion on the travel allowance of the directors | संचालकांच्या प्रवास भत्त्यावर जोरदार चर्चा

संचालकांच्या प्रवास भत्त्यावर जोरदार चर्चा

Next

कोल्हापूर : संचालक बैठक भत्त्यात तब्बल तीन लाख पाच हजारांची वाढ झाल्याचे निदर्शनास आणून देत नेमका भत्ता देता किती? अशी विचारणा करीत काही सभासदांनी हा विषय ताणून धरल्याने त्यावर जोरदार चर्चा झाली.
शेतकरी संघाची बदनामी करणाऱ्या ‘गोकुळ’ प्रशासनाचा निषेध करीत, ‘गोकुळ’च्या संचालकांची चरण्याची कुरणे बंद होणार म्हणूनच आकांडतांडव सुरू असल्याचा आरोप जयसिंग हिर्डेकर यांनी केला.
शेतकरी संघाची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी शाहू स्मारक भवनात झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष युवराज पाटील होते.
गतवर्षी संचालक बैठक व प्रवास भत्त्यांवर तीन लाख ८२ हजार खर्च झाले. या वेळेला सहा लाख ८७ हजार रुपये कसा झाला? प्रत्येक संचालकाला किती भत्ता देता? अशी विचारणा आकाराम पाटील (पाडळी खुर्द) यांनी केली. जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीने ३७५ रुपये भत्ता देत असल्याचे सचिव आप्पासाहेब निर्मळ यांनी सांगितले. यावर हरकत घेत, सत्तारूढ मंडळींनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भत्ता घेणार नसल्याचे अभिवचन दिले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करीत पाटील यांनी संचालकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. संचालकांची संख्या वाढल्याने भत्त्यात वाढ झाल्याचे निर्मळ यांनी सांगितले. एक कोटी नफा कमविणार तर त्याचा आराखडा काय? अशी विचारणा संभाजी जगदाळे (कोल्हापूर) यांनी केली. संघाच्या जागा भाड्याने दिल्या आहेत, नवीन शाखा सुरू करणार असल्याने कोटीपेक्षा अधिक नफा होईल, असा विश्वास अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला. बाजार समित्यांच्या जोखडातून शेतकरी बाहेर पडला आहे, भाजीपाला खरेदी-विक्रीत संघाने उतरावे, अशी मागणी शिवाजीराव पोवार यांनी केली. गोडावून भाड्याने देताना जागरूकपणे करार करा, बैल छाप मिश्रखत सुरू करा, औषध दुकान, पेट्रोल पंप सुरू करण्याची मागणी सभासदांनी केली. ‘गोकुळ’च्या सभेत संघाची बदनामी केल्याचे निदर्शनास आणून देत, ‘संघ चालवावा तर शेतकरी संघ’ असा कारभार करण्याचे आवाहन भैया माने (कागल) यांनी केले. संचालकांची चरण्याची कुरणे बंद होणार म्हणून कारभाऱ्यांचे आकांडतांडव सुरू असल्याची टीका हिर्डेकर (बाजारभोगाव) यांनी केली. दिलीप खाडे (सांगरूळ), किरण पास्ते, नामदेव चांदणे (पिरळ) यांनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)


नवखा आहे...: भुयेकरांकडून चिमटा
व्यासपीठावरील संचालकांची नावे घेताना शशिकांत पाटील-चुयेकर यांचा उल्लेख करीत आनंदरावांचा चिरंजीव नवखा आहे; पण थोडा इकडे-तिकडे भरकटतोय, अशा शब्दांत बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी चिमटा काढला.

Web Title: Vigorous discussion on the travel allowance of the directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.