कवठेमहांकाळच्या राजकारणात विजय कुलकर्णींची मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 12:03 AM2017-03-19T00:03:10+5:302017-03-19T00:03:10+5:30

राष्ट्रवादीसह घोरपडेंना आव्हान : खासदारांच्या सहकार्यावर मोर्चेबांधणी

Vijay Kulkarni's thriller in poetic politics | कवठेमहांकाळच्या राजकारणात विजय कुलकर्णींची मुसंडी

कवठेमहांकाळच्या राजकारणात विजय कुलकर्णींची मुसंडी

Next

अर्जुन कर्पे ल्ल कवठेमहांकाळ
तालुक्याच्या राजकारणात रांजणीच्या विजयकाका कुलकर्णी यांनी जोरदार एन्ट्री केली असून, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी रांजणी गटात राष्ट्रवादीला आणि अजितराव घोरपडेंना चेक दिला आहे. खा. संजयकाका पाटील यांच्या सहकार्याने कुलकर्णी यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीत भाजप-काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी-अजितराव घोरपडे यांची स्वाभिमानी आघाडी असा सामना झाला. खा. पाटील यांच्या आघाडीला केवळ पंचायत समितीच्या एका जागेवर समाधान मानावे लागले. ढालगाव गणात विकास हाक्के हे त्यांचे एकमेव उमेदवार निवडून आले. परंतु काही गटात खा. पाटील गटाने काँग्रेसला तसेच स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र करीत बेरजेचे राजकारण केले. काही ठिकाणी चुरशीची लढत देत खासदारांच्या शिलेदारांनी निसटता पराभव पत्करला. परंतु भविष्यातील टोकाच्या संघर्षाचा इशाराही दिला आहे.
रांजणी जिल्हा परिषद गट अजितराव घोरपडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याआधीच्या प्रत्येक जि. प., पं. स. निवडणुकीत पाच हजाराच्या फरकाने जि. प. उमेदवार विजयी होत असे, तर रांजणी पंचायत समितीचा उमेदवार हजाराच्या मताधिक्याने निवडून यायचा. परंतु या निवडणुकीत ही सर्व समीकरणे खा. पाटील यांच्या सहकार्याने विजयकाका कुलकर्णी यांनी बदलून टाकली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहज, सोपी वाटणारी निवडणूक घाम फोडणारी करून टाकली.
रांजणी गणात कुलकर्णी यांनी विकास भोसले, बंटी भोसले, किशोर पाटील, हणमंत देसाई, उदय भोसले, माजी पंचायत समिती सदस्य पतंगराव यमगर यांना बरोबर घेतले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष नारायण पवार यांच्या स्नुषा नीलिमा पवार विरुद्ध भाजपच्या स्वाती देसाई यांचा सामना झाला. यात २00 मतांनी स्वाती देसाई यांना पराभव पत्करावा लागला. परंतु ही लढत राष्ट्रवादीला घाम फोडणारी ठरली.
विजयकाकांच्या डावपेचांनी व चालीने चुरशीची झाली. स्वाती देसाई नाममात्र मतांनी पराभूत झाल्या. रांजणी गटात राष्ट्रवादी आणि अजितराव घोरपडे यांना खा. संजय पाटील यांच्या सहकार्याने विजय कुलकर्णी यांनी चेक दिला आहे. खा. पाटील यांनी या गटात रांजणी, धुळगाव, लोणारवाडी, करोली, हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, रामपूरवाडी येथील तरुणांची फळी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उभी करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. या गटात भाजप आणि काँग्रेसने घेतलेली मते राष्ट्रवादी, अजितराव घोरपडे, आ. सुमनतार्इंना आत्मचिंतन करायला लावणारी आहेत.


दोन हजार फरकाने विजय
रांजणी जिल्हा परिषद गटात बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांच्या पत्नी सारिका शेजाळ विरुध्द स्वाभिमानी आघाडीच्या आशाताई पाटील यांच्यातील लढतही जोरात झाली. दोन हजार मतांच्या फरकाने पाटील यांनी विजय मिळविला, परंतु हे मताधिक्य पाच हजाराच्या खाली प्रथमच आले. याआधीच्या निवडणुकांमध्ये अजितराव घोरपडे यांचा उमेदवार पाच हजारावर मतांनी निवडून यायचा. त्यामुळे या गटात घोरपडे यांना नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार, हे निश्चित आहे.

Web Title: Vijay Kulkarni's thriller in poetic politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.