मोटारसायकल दुरुस्त करताना शब्द लागले सुचू, मेकॅनिक विजय पाटील बनले कादंबरीकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 04:25 PM2022-01-31T16:25:52+5:302022-01-31T16:26:11+5:30
मेकॅनिक म्हणून काम करणारे विजय शहाजी पाटील यांची आता लेखक म्हणून ओळख दृढ होऊ लागली
समीर देशपांडे
कोल्हापूर : मोटारसायकल दुरुस्त करताना कथेचा विषय त्यांच्या डोक्यात येऊ लागला. हातात पाना घेऊन नटबोल्ट निखळताना त्यांना शब्द सुचू लागले आणि यातूनच मग एका कादंबरीकाराचा जन्म झाला. इथल्या शाहू स्टेडियमच्या गाळ्यात मेकॅनिक म्हणून काम करणारे विजय शहाजी पाटील यांची आता लेखक म्हणून ओळख दृढ होऊ लागली आहे.
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे हे पाटील यांचे मूळ गाव. तेथील रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे १२ वी कॉमर्सपर्यंतचे शिक्षण झाले. कोल्हापूर टेक्निकलमध्ये मोटर रिवायडिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्राॅनिक्सचे शिक्षण त्यांनी घेतले. १९९४ पासून त्यांनी दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये उमेदवारी सुरू केली. तीन वर्षात यातील कौशल्य शिकून घेतल्यानंतर उद्यमनगरमध्ये तीन वर्षे भाड्याच्या काळात वर्कशॉप सुरू केले. आता शाहू स्टेडियमच्या मालकीच्या गाळ्यात त्यांचे वर्कशॉप सुरू आहे.
एकीकडे चरितार्थासाठी पाटील यांची धडपड सुरू असताना दुसरीकडे अनेक विषय त्यांना डोक्यात घोळत होते. त्यांनी ते शब्दांच्या माध्यमातून कागदावर आणले. शिक्षण संपल्यानंतर अनेक मित्रांना त्यांनी आपल्या कथा दाखवल्या. शेतकऱ्याच्या आयुष्यावर त्यांनी ‘आम्ही जगाचे कैवारी’ ही कादंबरी लिहिली. वाचन कट्टाचे युवराज कदम यांनी ती प्रकाशित केली आणि मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या पाटील यांना लेखक म्हणून ओळख मिळाली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी .शिर्के आणि प्रेरणादायी वक्ते इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते या कादंबरीचे चार महिन्यांपूर्वी प्रकाशन झाले. अनेक महाविद्यालयांमध्ये, वाचनालयांमध्ये त्यांची ही कादंबरी पोहोचली आहे. त्यांना कादंबरी आवडल्याची पत्रेही येत आहेत. लिखाणाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या पाटील यांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून शेतकऱ्याचे दुखणे मांडत असताना आपली एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे.
माझ्या ‘आम्ही जगाचे कैवारी’ या कादंबरीला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझा ‘अंश’ हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून लवकरच दुष्काळग्रस्तांचे दुख मांडणारी ‘ऊर्मी आणि दिशा’ ही कादंबरी प्रकाशित होणार आहे. या शब्दांच्या माध्यमातून मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला लेखक म्हणून एक वेगळी ओळख मिळू लागली आहे याचे समाधान आहे. -विजय पाटील, कसबा वाळवे