विजयाचा ‘शुअर शॉट’ ५० हजारांत...!

By admin | Published: September 29, 2014 12:54 AM2014-09-29T00:54:52+5:302014-09-29T01:16:26+5:30

चौरंगी लढतीने रंगत : अनेकांना लागणार अनपेक्षित लॉटरी

Vijay shot 'Shure Shot' in 50 thousandths ...! | विजयाचा ‘शुअर शॉट’ ५० हजारांत...!

विजयाचा ‘शुअर शॉट’ ५० हजारांत...!

Next

विश्वास पाटील / कोल्हापूर
प्रत्येक मतदारसंघातील मतदान सरासरी तीन लाखांपर्यंत आहे. निवडणुकीत चुरस असल्याने सरासरी ७५ टक्के मतदान होईल, असे गृहीत धरले तरी ज्या उमेदवारांकडे ५० हजार मतांचे पॉकेट आहे, त्याला विजयाची संधी जास्त असल्याचे चित्र विधानसभा निवडणूक १९९९ च्या आकडेवारीच्या आधारे पुढे आले आहे. बहुतांश मतदारसंघांत चौरंगी लढतीचे चित्र दिसते आहे. आतापर्यंत काहींची निवडणूक सोपी होती, ती आता मतविभागणीमुळे अवघड बनली आहे व ज्यांना एकास एक लढतीत विजयासाठी जिवाचे रान करावे लागले असते, ते आता काही प्रमाणात सुरक्षित झाले आहेत.
राज्यात १९९९ ला काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादीचा जन्म झाला व ते विधानसभा निवडणुकीस स्वबळावर सामोरे गेले. त्यावेळी शिवसेना-भाजप युती मात्र एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी गेली; परंतु या निवडणुकीत मात्र दोन्ही काँगे्रसच्या वाटा वेगळ्या झाल्या; तर शिवसेना-भाजपचाही घटस्फोट झाला. मनसेही रिंगणात उतरली. काही भागांत प्रादेक्षिक पक्षांचे अस्तित्व दखल घेण्यासारखे आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून राज्यातही सहानुभूतीची हवा आहे. शिवसेनाही कधी नव्हे तेवढी आक्रमक बनली. त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे.
विधानसभेच्या १९९९ च्या लढतीत सर्वाधिक मतदान सांगरूळमधून होऊन संपतराव पवार यांना ६८ हजार ५७६ मते मिळाली होती; तर सर्वांत कमी मतदान कोल्हापूर शहरात होऊन शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांना ३५ हजार ३०५ इतकी मते मिळाली होती. सर्वांत कमी मताधिक्क्य कागलमधून हसन मुश्रीफ यांचे २ हजार ८८१ इतके होते. दीड ते दोन लाखांपर्यंत मतदारसंख्या असलेले आठ मतदारसंघ होते. आता या निवडणुकीत नव्याने मतदान करणाऱ्या व तरुण मतदारांचा भरणा जास्त आहे. या वेळी कोल्हापूर दक्षिणमध्ये सर्वाधिक ३ लाख ८ हजार ४९५ मतदार आहेत. सर्वांत कमी मतदार २ लाख ६८ हजार ५८६ इचलकरंजी मतदारसंघात आहेत.
रिंगणातील उमेदवारांची संख्या वाढली की उलटेसुलटे व अंदाज चुकविणारे निकाल लागू शकतात. १९९९ च्या लढतीत कोल्हापूर शहर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार सुरेश साळोखे यांना अवघी ३५ हजार मते मिळाली तरी ते ७ हजार २३७ मतांनी विजयी झाले; कारण त्यावेळी काँग्रेसचे महादेवराव आडगुळे, शेकापचे प्रा. विष्णुपंत इंगवले आणि राष्ट्रवादीचे आर. के. पोवार यांच्यात मतविभागणी झाली. विरोधातील चौघांच्या मतांची बेरीज ७२ हजार होते. विजयी झालेल्या उमेदवारांना सरासरी ५८ हजार मते मिळाली. आता मतदारसंख्या वाढली. त्यावेळी राज्यात पाच वर्षे शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते व त्यांच्या भ्रष्ट कारभाराने जनता वैतागली होती. आता दोन्ही काँग्रेसबद्दल, त्यातही राष्ट्रवादीबद्दल लोकांच्या मनात जास्त राग आहे. संभाव्य मतविभागणीचा विचार करता, ज्याच्याकडे किमान ५० हजार मतांचे पॉकेट आहे, तो विजयाचा भक्कम दावेदार ठरू शकेल, अशी स्थिती नव्या राजकीय समीकरणामुळे तयार झाली आहे.

Web Title: Vijay shot 'Shure Shot' in 50 thousandths ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.