विजय सिंघल शेतकऱ्यांचा करंट तुम्हाला सोसणार नाही : राजू शेट्टी
By विश्वास पाटील | Published: February 19, 2023 02:31 PM2023-02-19T14:31:17+5:302023-02-19T14:31:25+5:30
"महावितरणचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक विजय सिंघल हे राज्यातील शेतकऱ्यांना ७ रूपये ३५ पैसे दराने तयार होणारी वीज १ रूपये ५० पैसे दराने देवून ८५ टक्के सवलत देत असल्याचा बागलबुवा करत आहेत."
कोल्हापूर : महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल, शेतकऱ्यांचा करंट तुम्हाला सोसणार नाही, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी लगावला.
महावितरणचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक विजय सिंघल हे राज्यातील शेतकऱ्यांना ७ रूपये ३५ पैसे दराने तयार होणारी वीज १ रूपये ५० पैसे दराने देवून ८५ टक्के सवलत देत असल्याचा बागलबुवा करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे संपादित करून धरणे बांधून त्याठिकाणी जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या विद्युत प्रकल्पातून तयार होणाऱ्या प्रतियुनिट वीजेचा खर्च २५ ते ५० पैसे इतका आहे. हे प्रकल्प खाजगी लोकांना चालविण्यास दिले जात असून ५० पैसे युनिटने तयार होणारी वीज त्यांच्याकडून ३.५० पैसे ते ५.५० पैसे दराने वीज खरेदी करून ग्राहकांच्या माथी ८ रूपयाने मारली जात आहे.
महावितरणची वीज वितरण गळती प्रत्यक्षात 30 टक्के आहे आणि शेती पंपांचा खरा वीज वापर 15 टक्के आहे. पण कागदोपत्री बनवाबनवी करून राज्य सरकारला सांगितले जाते की शेतीपंपांची वीज वापर 30 टक्के आहे आणि गळती पंधरा टक्के आहे. प्रत्यक्षात शेती पंपांची बिले दुप्पट करून शेती पंप वीज वापर 30 टक्के दाखविला जात आहे व मंत्रीमंडळाचीही दिशाभूल केली जात आहे. हा प्रकार गेली 10 वर्षे सातत्याने सुरू आहे व तो आम्ही संबंधित प्रत्येक सरकारच्या निदर्शनास आणला आहे. शेती पंप वीज वापर या नावाखाली लपविलेली ही अतिरिक्त पंधरा टक्के गळती म्हणजे दरवर्षी किमान 12 हजार कोटी रुपयांची चोरी व भ्रष्टाचार आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा नियोजन मंडळातून आयपीडीएस योजनेअंतर्गत ५ कोटी रूपयाचे एक काम एका ठेकेदाराने ३ टक्के कमी दराने भरणाऱ्या ठेकेदाराला थांबवून १२ टक्के जादा दराने निविदा भरलेल्या ठेकेदारास हे टेंडर देण्यास तेथील पालकमंत्री व अधिक्षक अभियंता संबधित ठेकेदारावर निविदा माघार घेण्यास दबाव आणत आहेत. या दोन्ही कंपन्यांमधील भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि नियोजनाचा अभाव यामुळे महावितरण तोट्यात जात आहे. याबद्दल बोलायला सिंघल यांची दातखीळी बसली आहे काय ?
शेतकऱ्यांना जादा शहाणपण शिकविण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा अजून बऱ्याच भानगडी माझ्याकडे आहेत. पाहिजे असल्यास प्रकाशगड समोर घोंगडे टाकून हिशोबाला बसूया मग समजेल कोण किती पाण्यात आहे ते ...?