‘कमळा’शिवाय विजयाची किमया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:12 AM2018-04-13T00:12:34+5:302018-04-13T00:12:34+5:30
कृष्णा सावंत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : भाजपचे नेते अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखालील आजरा शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपचे कमळ चिन्ह घेतले नाही म्हणून विरोधकांनी प्रचारात टीकेची झोड उठविली. मात्र, त्याबाबत मौन पाळून चराटी यांनी मुत्सद्दीपणे ‘कमळा’शिवाय विजयाची किमया साध्य केली. नगरपंचायतीच्या मंजुरीसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाची पोचपावतीच मतदारांनी विजयश्रीच्या स्वरूपात त्यांना दिली.
मुंबई ते आजरा तब्बल ४० फेऱ्या मारून अशोक चराटी यांनी नगरपंचायत स्थापनेसाठी पाठपुरावा केला. त्यांच्यासह त्यांचे सहकारी विलास नाईक, विजयकुमार पाटील, दशरथ अमृते, अरुण देसाई, आदींची जिद्द पाहून खुद्द मुख्यमंत्र्यांना आजरा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा लागला.
आजरा शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी-काँग्रेस-सेना युती यांच्याच दुरंगी सामना होईल असे वाटत असताना मुस्लिम समाजातील काही प्रमुखांनी तिसºया आघाडीचे रणशिंग फुंकले. त्यात भाजपचे जुने कार्यकर्ते जनार्दन टोपले यांनीही उडी घेतली. त्यांना शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी साथ दिली.
सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या राष्ट्रवादी-काँगे्रस-सेना आघाडीने आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार के . पी. पाटील यांच्या आक्रमक सभांमुळे प्रचारात आघाडी घेतली. ऐनवेळी रिंगणात उतरून देखील परिवर्तन आघाडीनेही हवा तयार केली. त्यामुळेच या निवडणुकीत चुरस झाली. मात्र, तिरंगी सामन्याचा फायदा चराटी यांनाच झाला.
विरोधकांचा प्रचाराचा धडाका आणि हल्लाबोल होऊनही विरोधकांवर कोणतीही टीका न करता जिद्दीने मंजुरी मिळविलेल्या नगरपंचायतीचा मुद्दा घेऊन चराटी यांनी ‘घर टू घर’ प्रचार केला. त्यामुळेच आजरेकरांनी त्यांनाच साथ दिली.