विजयन यांच्या टू टर्म पॉलिसीने संधी नव्हे... संधी साधली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:48+5:302021-03-14T04:21:48+5:30
पोपट पवार तिरुवनंतपुरम : तरुणतुर्कांना राजकारणात संधी देण्याच्या नावाखाली केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सलग दोन वेळा निवडून ...
पोपट पवार
तिरुवनंतपुरम : तरुणतुर्कांना राजकारणात संधी देण्याच्या नावाखाली केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सलग दोन वेळा निवडून आलेल्यांना विधानसभा निवडणुकीत माकपचे तिकीट नाकारून केरळच्या राजकारणात पहिल्यांदाच टू टर्म पॉलिसीचा मार्ग अवलंबला खरा. मात्र, विजयन यांची ही चाल मुख्यमंत्रिपदाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी तर नाही ना, अशी शंका आता राजकीय जाणकारांमधून व्यक्त होऊ लागली आहे. सलग दोन वेळा विधानसभा निवडणुकीत जिंकणाऱ्यांना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया -मार्क्सवादीने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सीपीआयएमच्या मातब्बर पाच मंत्र्यांचे विधानसभेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. ए.के. बालन, पी. जयराजन, जी. सुधाकरण, सी. रवींद्रनाथ, टी. एम. थॉमस आणि विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन या दिग्गज नेत्यांना टू टर्म पॉलिसीचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे हे पाचही मंत्री पिनराई विजयन यांचे पक्षांतर्गत स्पर्धक मानले जातात. त्यामुळे विजयन यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही नवी पॉलिसी राबवीत आपल्या पक्षांतर्गत विराेधकांना राजकीय स्पर्धेतून अंडरप्ले केले असल्याची चर्चा आहे. केरळमध्ये सीपीआयएम हा सुरुवातीपासून बी.एस. अच्युतानंदन आणि पिनराई विजयन या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. ज्या बड्या नेत्यांची उमेदवारी कापण्यात आली ते सर्वच नेते अच्युतानंदन गटाचे असल्याने विजयन यांची टू टर्म पॉलिसीची खेळी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोने तस्करीच्या प्रकरणात पिनराई विजयन यांचे नाव आल्याने नेतृत्वावरून पक्षामध्येच वादाच्या ठिणग्या पडत आहेत. विधानसभा निवडणुकीत पुन्हा डाव्यांची सत्ता आली, तर सीपीआयएम नेतृत्व मुख्यमंत्रीपदासाठी विजयन यांच्या नावाबाबत फेरविचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे टू टर्म पाॅलिसीचा आधार घेत विजयन यांनी पक्षांतर्गत स्पर्धकांना दूर सारत केरळची सूत्रे पुन्हा आपल्याकडेच कशी येतील यादृष्टीने खेळलेली ही चाल असल्याचे मानले जाते.
चौकट : पाच वेळा जिंकलेले विजयन रिंगणात कसे
सलग दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे सीपीआयएमचे मातब्बर यंदा केरळच्या रणांगणातून बाहेर असले तरी पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे पिनराई विजयन पुन्हा विधानसभेच्या आखाड्यात कसे, असा प्रश्न अच्युतानंदन गटाकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, पिनराई विजयन हे सलगपणे दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले नाहीत. त्यामुळे टू टर्म पॉलिसीचा नियम त्यांना लागू होत नसल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. पुढील २०२६ मधील विधानसभा निवडणूक मात्र टू टर्म पॉलिसीनुसार मला लढविता येणार नाही, असे विजयन सांगत असले तरी ७५ वर्षीय विजयन पुढच्या विधानसभा निवडणुकीवेळी ८० वर्षांचे होतील. त्यामुळे या वयात राजकारणाचा मार्ग धुंडाळतील का हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा या विजयन यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांनीही तीन वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, सलग दोन वेळा त्या सदस्य नसल्याने यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची त्यांना संधी मिळाली आहे.
चौकट
दिग्गज नसल्याने नुकसान
सलग सहा-सहा वेळा एकाच मतदारसंघातून निवडून येण्याची किमया साधणाऱ्या सीपीआयएमच्या पाच मंत्र्यांना टू टर्म पॉलिसीमुळे यंदा घरी बसावे लागल्याने संबंधित मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात ठेवणे पक्षासमोर मोठे आव्हान असणार आहे. प्रस्थापितांना उमेदवारी नाकारल्याने आधीच समर्थकांची नाराजी त्यात नव्या उमेदवाराला मतदार कितपत स्वीकारतील याबाबतही साशंकता आहे. सलग दोन वेळा निवडणूक जिंकलेल्या २५ आमदार आणि पाच मंत्र्यांच्या मतदारसंघात यंदा नवा चेहरा सीपीआयएमकडून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघांमध्ये काँग्रेसने मोठा जोर लावला आहे. त्यामुळे विजयन यांची टू टर्म पॉलिसी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत उत्सुकता आहे.