विजयन यांच्या टू टर्म पॉलिसीने संधी नव्हे... संधी साधली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:59+5:302021-03-14T04:21:59+5:30

पोपट पवार तिरुवनंतपूरम : तरुण तुर्कांना राजकारणात संधी देण्याच्या नावाखाली केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सलग दोन वेळा निवडून ...

Vijayan's two-term policy is not an opportunity ... it is an opportunity | विजयन यांच्या टू टर्म पॉलिसीने संधी नव्हे... संधी साधली

विजयन यांच्या टू टर्म पॉलिसीने संधी नव्हे... संधी साधली

Next

पोपट पवार

तिरुवनंतपूरम : तरुण तुर्कांना राजकारणात संधी देण्याच्या नावाखाली केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सलग दोन वेळा निवडून आलेल्यांना विधानसभा निवडणुकीत माकपचे तिकीट नाकारून केरळच्या राजकारणात पहिल्यांदाच टू टर्म पॉलिसीचा मार्ग अवलंबला खरा; मात्र, विजयन यांची ही चाल मुख्यमंत्रिपदाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी तर नाही ना, अशी शंका आता राजकीय जाणकारांमधून व्यक्त होऊ लागली आहे. सलग दोन वेळा विधानसभा निवडणुकीत जिंकणाऱ्यांना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया -मार्क्सवादीने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सीपीआयएमच्या मातब्बर पाच मंत्र्यांचे विधानसभेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. ए. के. बालन, पी. जयराजन, जी. सुधाकरन, सी. रवींद्रनाथ, टी. एम. थॉमस आणि विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन या दिग्गज नेत्यांना टू टर्म पॉलिसीचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे हे पाचही मंत्री पिनराई विजयन यांचे पक्षांतर्गत स्पर्धक मानले जातात. त्यामुळे विजयन यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही नवी पॉलिसी राबवत आपल्या पक्षांतर्गत विराेधकांना राजकीय स्पर्धेतून अंडरप्ले केले असल्याची चर्चा आहे. केरळमध्ये सीपीआयएम हा सुरुवातीपासून बी. एस. अच्युतानंदन आणि पिनराई विजयन या दोन गटांमध्ये विभागाला गेला आहे. ज्या बड्या नेत्यांची उमेदवारी कापण्यात आली ते सर्वच नेते अच्युतानंदन गटाचे असल्याने विजयन यांची टू टर्म पॉलिसीची खेळी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोने तस्करीच्या प्रकरणात पिनराई विजयन यांचे नाव आल्याने नेतृत्वावरून पक्षामध्येच वादाच्या ठिणग्या पडत आहेत. विधानसभा निवडणुकीत पुन्हा डाव्यांची सत्ता आली तर सीपीआयएम नेतृत्व मुख्यमंत्रिपदासाठी विजयन यांच्या नावाबाबत फेरविचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे टू टर्म पाॅलिसीचा आधार घेत विजयन यांनी पक्षांतर्गत स्पर्धकांना दूर सारत केरळची सूत्रे पुन्हा आपल्याकडेच कशी येतील, यादृष्टीने खेळलेली ही चाल असल्याचे मानले जाते.

चौकट :

पाच वेळा जिंकलेले विजयन रिंगणात कसे

सलग दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे सीपीआयएमचे मातब्बर यंदा केरळच्या रणांगणातून बाहेर असले तरी पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे पिनराई विजयन पुन्हा विधानसभेच्या आखाड्यात कसे, असा प्रश्न अच्युतानंदन गटाकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, पिनराई विजयन हे सलगपणे दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले नाहीत. त्यामुळे टू टर्म पॉलिसीचा नियम त्यांना लागू होत नसल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. पुढील २०२६ मधील विधानसभा निवडणूक मात्र, टू टर्म पॉलिसीनुसार मला लढविता येणार नाही, असे विजयन सांगत असले तरी ७५ वर्षीय विजयन पुढच्या विधानसभा निवडणुकीवेळी ८० वर्षांचे होतील. त्यामुळे या वयात राजकारणाचा मार्ग धुंडाळतील का, हा प्रश्नच आहे.

Web Title: Vijayan's two-term policy is not an opportunity ... it is an opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.