शिवाजी विद्यापीठाच्या ‘सिनेट’मध्ये विकास आघाडीचे बहुमत

By संतोष.मिठारी | Published: November 2, 2022 09:21 PM2022-11-02T21:21:50+5:302022-11-02T21:22:14+5:30

या निवडणुकीच्या प्रचार प्रारंभ आणि बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Vikas Aghadi's majority in the 'Senate' of Shivaji University | शिवाजी विद्यापीठाच्या ‘सिनेट’मध्ये विकास आघाडीचे बहुमत

शिवाजी विद्यापीठाच्या ‘सिनेट’मध्ये विकास आघाडीचे बहुमत

googlenewsNext

कोल्हापूर: गेल्या पाच वर्षांत शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विद्यापीठ विकास आघाडीने योगदान दिले. ते लक्षात घेऊन प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक, पदवीधरांचे आघाडीला भक्कम पाठबळ अधिसभा (सिनेट) निवडणुकीत दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत विविध गट, अभ्यासमंडळांत आघाडीचे एकूण ५४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सिनेटमध्ये विकास आघाडीचे बहुमत झाले आहे, असा दावा आघाडीप्रमुख डॉ. संजय डी. पाटील आणि सचिव डॉ. व्ही. एम. पाटील यांनी बुधवारी येथे केला.

या निवडणुकीच्या प्रचार प्रारंभ आणि बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हॉटेल सयाजी येथील या कार्यक्रमास आमदार जयंत आसगावकर, डॉ. क्रांतीकुमार पाटील, अमित कुलकर्णी, धैर्यशील पाटील प्रमुख उपस्थित होते. संस्थाचालक गटात ५, विद्या परिषदेत २, प्राचार्यांमध्ये ८ आणि २८ पैकी १८ अभ्यास मंडळातील ३९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आघाडीने २५ हजार पदवीधरांची नोंदणी केली आहे. त्यामुळे नोंदणीकृत पदवीधर गटातील १० जागांवरही आमचे वर्चस्व राहील. पदवीधर, शिक्षक गटात आम्ही ताकदीने लढणार आहोत, असे डॉ. संजय डी. पाटील यांनी सांगितले.

इंजिनिअरिंग, फार्मसी, शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळावर आघाडीचे वर्चस्व आहे. उर्वरित काही मंडळांवर पूर्ण बहुमत आहे. शिक्षक गटातील २ तर, पदवीधरमधील १ जागा बिनविरोध होईल. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा आघाडीच्या जागा वाढल्या असल्याचे डॉ. व्ही. एम. पाटील यांनी सांगितले. विद्यापीठाच्या गुणवत्तावाढीसाठी आघाडीने दिलेले योगदान, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, उच्च शिक्षणासमोरील भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याचा अजेंडा घेऊन आघाडी मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे धैर्यशील पाटील, अमित कुलकर्णी यांनी सांगितले.

संस्थाचालक, प्राचार्य गटातील बिनविरोध उमेदवार
संस्थाचालक गट : पृथ्वीराज संजय पाटील, ॲड. वैभव पाटील, प्रकाश बापू पाटील, अमित कुलकर्णी, डॉ. मंजिरी मोरे-देसाई. प्राचार्य गट : डॉ. बी. एम. पाटील, संजय सावंत, तेजस्विनी मुढेकर, एस. आर. पाटील, अरुण पाटील, अरुण शेजवळ, एस. बी. केंगार, बापूसाहेब सावंत.

या निवडणुकीत प्रत्येक गटात उमेदवारी देताना आघाडीतील सर्व घटकांचा समतोल साधला आहे. नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पुढील पाच वर्षांत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आघाडी कार्यरत राहणार आहे.- डॉ. संजय डी. पाटील, प्रमुख, विद्यापीठ विकास आघाडी

विद्यापीठाच्या घाईने संघटनांची धावपळ
ऐन दिवाळीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत, माघारीनंतर अपिलांवर सुनावणी असा प्रकार विद्यापीठाने या निवडणुकीत केला आहे. निवडणूक कार्यक्रमाबाबत विद्यापीठाने घाई करण्याची गरज नव्हती. त्यामुळे संघटनांची धावपळ होत आहे. अभ्यास मंडळात अर्ज भरताना त्यात उमेदवाराची जात (कॅटगरी) नोंदविण्याचा रकाना ठेवला होता. ते नोंदविणे अपेक्षित नव्हते. अर्ज भरणे, माघार, अपील यासाठी पुरेसा कालावधी मिळाला नसल्याचे डॉ. क्रांतिकुमार पाटील, व्ही. एम. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Vikas Aghadi's majority in the 'Senate' of Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.