कोल्हापुरातील विचारे विद्यामंदिरला लवकरच मिळणार इमारत, विद्यार्थी झाडाखाली बसून घेत होते शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 04:59 PM2023-06-21T16:59:28+5:302023-06-21T16:59:52+5:30
‘लोकमत’ने २० जूनच्या अंकात ‘फुलेवाडीतील विचारे विद्यामंदिरची झाडाखाली भरते शाळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासनाने या शाळेच्या इमारतीसाठी हालचाली सुरू केल्या
कोल्हापूर : इमारत नसल्याने फुलेवाडीतील सेमी इंग्रजी माध्यमातील रावबहादूर दाजीबा विचारे विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना पत्र्याच्या शेडखाली बसून शिक्षण घ्यावे लागते. याबाबत ‘लोकमत’ने २० जूनच्या अंकात ‘फुलेवाडीतील विचारे विद्यामंदिरची झाडाखाली भरते शाळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासनाने या शाळेच्या इमारतीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी मंगळवारी या शाळेला भेट देऊन सद्य:स्थितीची पाहणी केली. सीएसआरमधून इमारतीसाठी निधी मिळवण्याबाबत महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू असून, रोटरी क्लब व अन्य एका संस्थेचा प्रस्ताव मनपाकडे आला आहे. या संस्थेशी अधिकाऱ्यांची बोलणी सुरू आहे. याबाबत निर्णय न झाल्यास जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून या शाळेची इमारत बांधण्यासाठी प्रशासन विचाराधीन असल्याचे शंकर यादव यांनी सांगितले.
खासगी इमारतीत हलविले वर्ग
या शाळेचा प्रत्येक वर्षी एक-एक वर्ग वाढत आहे. चौथीचा वर्ग एका दुकानाच्या शेडखाली भरवला जात होता. याच परिसरातील खासगी व्यक्तीच्या तीन खोल्या महापालिकेने ताब्यात घेतल्या असून, या इमारतीत मंगळवारी चौथीचा वर्ग भरविण्यात आला.
बीडी कामगार वसाहतीमध्ये जागेचा प्रस्ताव
शाळेच्या नियोजित इमारतीसाठी येथील बीडी कामगार वसाहतीमधील २० गुंठ्यांपेक्षा अधिकच्या जागेचा प्रस्ताव आहे. या जागेवर चार खोल्यांची इमारत बांधण्यात येणार आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्यापर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही. नवीन शाळेला मिळणारा प्रतिसाद पाहूनच इमारतीचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या शाळेतील प्रवेश फुल्ल होत आहेत. त्यामुळे प्रतिसाद पाहण्यासाठी अजून किती दिवस विनाइमारतीचे विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानार्जन करायला लावणार आहा,त असा सवाल पालकांतून उपस्थित होत आहे.
फक्त सुरुवात करा, लोकसहभागातून निधी जमवू
मनपा प्रशासनाने जागा वर्ग करून प्रस्तावित जागेवर सुरुवातीच्या बांधकामासाठी निधी द्यावा, त्यानंतरच्या बांधकामासाठी लोकसहभागातून निधी उभारण्याचा बहुतांश पालकांनी निर्धार केला आहे.
सरकारी शाळा टिकाव्यात म्हणून आम्ही पाल्यांना महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे महापालिकेनेही प्रस्तावित जागा महापालिकेकडे वर्ग करून शाळेची इमारत त्वरित उभी करावी. -स्वाती कृष्णात, पालक