विक्रम गोखलेंंना ‘भावे पदक’
By admin | Published: October 13, 2015 11:42 PM2015-10-13T23:42:27+5:302015-10-13T23:43:22+5:30
रंगभूमीदिनी वितरण : राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचा आनंद : गोखले
सांगली : येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने देण्यात येणारे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ यंदा ज्येष्ठ अभिनेते, नाटककार विक्रम गोखले यांना जाहीर करण्यात आले. रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबरला अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा अभिनेत्री श्रीमती फैय्याज यांच्याहस्ते हे पदक प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, रंगभूमी क्षेत्रातील हे मानाचे पदक असून, आजवर बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे यांच्यापासून जब्बार पटेल यांच्यापर्यंत अनेक दिग्गज रंगकर्मी, नाटककार, लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराचे यंदाचे पन्नासावे वर्ष आहे. गौरव पदक, शाल, श्रीफळ आणि ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा विक्रम गोखले यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहेदि. ३० आॅक्टोबर १९४५ रोजी जन्मलेले विक्रम गोखले भारतीय चित्रपटातील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई गोखले यांचे नातू आणि प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र आहेत. नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. व्यावसायिक मराठी आणि हिंदी रंगभूमीवर त्यांनी सुमारे तीस नाटके सादर केली आहेत. ‘बॅरिस्टर’ नाटकातील त्यांची भूमिका अजरामर झाली. स्वामी, जास्वंदी, कमला, महासागर, राहू-केतू, दुसरा सामना, संकेत मिलनाचा, मी माझ्या मुलांचा, नकळत सारे घडले, कथा आणि मकरंद राजाध्यक्ष आदी नाटकांद्वारे त्यांनी रसिकांची मने जिंकली आहेत. गेल्या ५८ वर्षांपासून विक्रम गोखले चित्रपटसृष्टीतही काम करीत आहेत. ७५ हिंदी, ६० मराठी, २० गुजराती, शिवाय कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमधून त्यांनी काम केले.
अभिनय, दिग्दर्शनात त्यांना देश, विदेशातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. (प्रतिनिधी)
पिता-पुत्राचा सन्मान--विष्णुदास भावे गौरव पदक मानाचे समजले जाते. प्रदीर्घ काळ रंगभूमीची सेवा करणाऱ्यांचा या पदकाद्वारे सन्मान केला जातो. अभिनेते चंद्रकांत गोखले यांना काही वर्षांपूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता त्यांचे पुत्र विक्रम गोखले यांनाही याच पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. एकाच घरातील दोन कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पिता-पुत्राचा सन्मान
विष्णुदास भावे गौरव पदक मानाचे समजले जाते. प्रदीर्घ काळ रंगभूमीची सेवा करणाऱ्यांचा या पदकाद्वारे सन्मान केला जातो. अभिनेते चंद्रकांत गोखले यांना काही वर्षांपूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता त्यांचे पुत्र विक्रम गोखले यांनाही याच पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. एकाच घरातील दोन कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रंगभूमीवरील प्रतिष्ठित विष्णुदास भावे पुरस्कारास बालगंधर्वांपासून एक परंपरा आहे. राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचा जेवढा आनंद होईल तितकाच रंगभूमीवरीव सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद होत आहे.
- विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते