कोल्हापूर विभागात विक्रमी ऊस गाळप
By admin | Published: April 19, 2016 12:02 AM2016-04-19T00:02:57+5:302016-04-19T00:52:16+5:30
सरासरी १२.४१ उतारा : दोन कोटी ७८ लाख २५ हजार २४० क्विंटल उत्पादन; गाळपात ‘जवाहर’, तर उताऱ्यात ‘गुरुदत्त’ आघाडीवर
प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागातील ३८ साखर कारखान्यांनी हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला असून, या हंगामात दोन कोटी २४ लाख २७ हजार ४३० मे. टन विक्रमी उसाचे गाळप केले आहे. १२.४१ च्या सरासरी साखर उताऱ्यासह दोन कोटी ७८ लाख २५ हजार २४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ऊस गाळपात जवाहर-हुपरीने १५ लाख १६ हजार १०० मे. टन उसाचे गाळप करत विभागात आघाडी घेतली आहे, तर गुरुदत्त-टाकळीने
सरासरी १३.५३ टक्के साखर उतारा मिळवत उताऱ्यात आघाडी घेतली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ.आर.पी.च्या ८० टक्के पहिला हप्ता देण्यासाठी आघाडी घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही ती दिली आहे. चालू हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पैकी २१ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम पूर्ण करत एक कोटी ४४ लाख ७१ हजार ४५३ मे. टन उसाचे गाळप केले आहे. १२.६० च्या सरासरी साखर उताऱ्यासह एक कोटी ८२ लाख ४० हजार १५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथीलच जवाहर साखर कारखान्याने १५ लाख १६ हजार मे. टन उसाचे गाळप करून विभागात ऊस गाळपात आघाडी घेतली आहे, तर गुरुदत्त-टाकळीने १३.५३ चा सरासरी साखर उतारा मिळवत विभागातच नव्हे, तर पण राज्यात प्रथम क्रमांकाचा उतारा मिळविला आहे.
सांगली जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ६३ लाख ६२ हजार ६८५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. १२.१९ च्या सरासरी साखर उताऱ्यासह ७७ लाख ५७ हजार ५४० क्विंटल
साखर उत्पादन केले आहे. हुतात्मा किसन अहिर, वाळवा कारखान्याने १३.०२ चा साखर उतारा मिळवून सांगली जिल्ह्यात आघाडी घेतली आहे, तर रा. बा. पाटील साखराळे युनिट-१ ने १० लाख ५२ हजार ६०० मे. टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे.
मागील हंगाम २०१४/१५ मध्ये कोल्हापूर विभागात दोन कोटी ११ लाख ९७ हजार ६०५ मे. टन उसाचे गाळप झाले होते. १२.५३ च्या सरासरी साखर उताऱ्यासह दोन कोटी ६५ लाख ७० हजार ११६ क्विंटल साखर उत्पादन झाले होते. चालू हंगामात १२ लाख ३० हजार मे. टन उसाचे गाळप जादा झाले असून, १२ लाख ५५ हजार १२४ क्विंटल साखर उत्पादन जादा झाले आहे. मागील हंगामापेक्षा ०.१० ने उतारा मात्र घसरला आहे.
कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा
साखर कारखाने२३ (सहकारी १७, खासगी ६)१८ (सहकारी १३, खासगी ५)
हंगाम घेतलेले २११७
बंद कारखाने ०२०१
उसाचे एकूण गाळप१ कोटी ४४ लाख६३ लाख ६२ हजार
७१ हजार ४५३ मे. टन ६८५ मे. टन
साखरेचे एकूण उत्पादन १ कोटी ८२ लाख ७७ लाख ५७ हजार
४० हजार १५ क्विंटल५४० क्विंटल
सरासरी साखर उतारा१२.६०१२.१९
५० हजार टन ऊस शिल्लक
कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर, दत्त-शिरोळ, शाहू-कागल, कुंभी-कासारी कुडित्रे, हमीदवाडा हे पाच साखर कारखाने सुरू आहेत, तर सांगली जिल्ह्यातील हुतात्मा किसन अहिर व सोनहिरा हे दोन कारखाने अद्याप सुरू आहेत.
साधारण ५० हजार टन ऊस गाळप शिल्लक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, २० एप्रिलपर्यंत सर्व कारखान्यांचे गाळप हंगाम संपणार आहेत.