विक्रमसिंह घाटगेंचे नाव सहकारात अजरामर
By admin | Published: April 16, 2015 12:34 AM2015-04-16T00:34:46+5:302015-04-16T00:35:22+5:30
सर्व पक्षीयांची आदरांजली : शोकसभेस मोठी गर्दी : मान्यवरांकडून राजेंच्या कार्याचा वारसा जपण्याचे आवाहन
कागल : विक्रमसिंह घाटगेंच्या रूपाने सहकारातील दीपस्तंभ उन्मळून पडला आहे. स्फटिकासारखे स्वच्छ-पारदर्शी-विश्वासार्हता-नैतिकता याचे दुसरे नाव म्हणजे राजेसाहेब होते. सहकारातील नवे कायदे-बदल असोत, अथवा महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे प्रश्न असोत, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो, अंतिमत: विक्रमसिंह घाटगेंचाच सल्ला घेत. त्यांचे नाव देशाच्या सहकारक्षेत्रात अजरामर राहील, अशा शब्दांत बुधवारी विक्रमसिंह घाटगेंना सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेसाठी मान्यवर मंडळीसह त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी झाली होती. येथील शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, राजेसाहेबांच्या आग्रहामुळेच मी लोकसभेच्या मैदानात उतरलो. मला सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी विचारत की शाहू साखर कारखाना एवढा दर देऊ शकतो तर तुम्ही का देऊ शकत नाही. असे भरीव काम त्यांनी केले.
माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनाने केवळ कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. सहकार चळवळीत कोणाच्या तोंडाकडे बघायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले की, राजघराण्याचा सुखी संपन्न वारसा असतानाही राजेंनी अत्यंत खडतर परिस्थितीशी संघर्ष करत कागलमध्ये छ. शाहू साखर कारखाना उभारला. त्यांच्यामुळेच तालुक्यात परिवर्तनाची लाट आली.
यावेळी माजी आमदार संजय घाटगे, आमदार उल्हास पाटील, के. पी. पाटील, काकासाहेब पाटील, डॉ. श्रीकृष्ण देशमुख, बजरंग देसाई, भरमुअण्णा पाटील, नामदेवराव भोईटे, डॉ. इंद्रजित मोहिते (कराड), बापूसाहेब पुजारी (सांगली), सुभाष जोशी (निपाणी), क्रांती साखरचे अरुण लाड, रयत साखरचे जयसिंगराव पाटील, कॉ. दिलीप पाटील, नगराध्यक्ष आशाकाकी माने, रणजितसिंह पाटील, शंकरराव पाटील-शिंगणापूरकर, विजयसिंह मोर, कृष्णा साखर कारखान्याचे सुरेश पाटील, शेतकरी संघटनेचे भगवान काटे, प्रा. जालिंदर पाटील, पी. जी. मेढे, सभापती पिन्टू लोहार, राजेंद्र जाधव, घटप्रभा कारखान्याचे प्रकाश पाटील, डॉ. निरंजन शहा, नम्रता कुलकर्णी, विलास मगदूम, बाबगोंडा पाटील, अतुल जोशी, आदींची भाषणे झाली.
आमदार वीरकुमार पाटील यांनी प्रास्ताविक करून श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. शिवराम भोजे, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड,एस. के. मगदूम, विजय औताडे, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
घाटगेंशिवाय पहिला कार्यक्रम
शाहू साखर कारखान्याच्या या कार्यस्थळावर गेल्या ३५ वर्षांत विक्रमसिंह घाटगेंशिवाय असा कोणताच मोठा कार्यक्रम झाला नव्हता. बुधवारी शोकसभेच्या निमित्ताने हा पहिला कार्यक्रम झाला. अत्यंत शिस्तबद्धपणे, व्यवस्थित संयोजनातून शोकसभा घेण्यात आली. प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचा शोकसंदेशही वाचून दाखविण्यात आला.
समरजितसिंहाच्या पाठीशी राहुया
या शोकसभेत सर्वच वक्त्यांनी विक्रमसिंह घाटगेंच्या आकस्मिक निधनाने घाटगे परिवार आणि शाहू ग्रुप पोरका झाला आहे. कधीही भरुन येणार नाही अशी पोकळी निर्माण झाली आहे, असे सांगून समरजितसिंह घाटगेंच्या पाठीशी उभे राहून राजेंचे कार्य पुढे नेऊया अशा भावना व्यक्त केल्या.